...त्यांनी मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला!
आधी दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही, नंतर मृतदेह नेण्यासाठी शववाहिका किंवा इतर वाहन मिळालं नाही. अखेर कुटुंबीयांनी मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला. बेळगावात ही धक्कादायक घटना घडली.
बेळगाव : शववाहिका किंवा अन्य वाहन न मिळाल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम.के.हुबळी या गावात ही घटना घडली आहे.
एम के हुबळी गावातील सत्तर वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची शनिवारी (15 ऑगस्ट) रात्री तब्येत बिघडली. पण वृद्धाला उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वृद्धावर उपचार होऊ शकले नाहीत आणि घरातच त्याचा रात्री मृत्यू झाला. रविवारी (16 ऑगस्ट) सकाळी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह स्मशानात नेण्यासाठी शववाहिका किंवा अन्य वाहन देखील मिळाले नाही. त्यामुळे मृत वृद्धाच्या कुटुंबीयांनी सायकलवरुन मृतदेह स्मशानात नेण्याचा निर्णय घेतला.
इथे ओशाळली माणुसकी.. बेळगावात पतीचा मृतदेह एकटीने हातगाडीवरुन नेऊन पत्नीने अंत्यसंस्कार केले!
सायकलवरुन स्मशानात मृतदेह नेण्यात येत असलेले पाहून ग्रामस्थ अवाक झाले. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रुग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध होणे देखील अवघड झाले आहे.
धुळ्यात तृतीयपंथियांकडून मृत कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार
काही दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी देखील त्याचा मृत्यू झाल्यावर शेजारी आणि नातेवाईक मृतदेहाच्या जवळ देखील आले नाहीत. कोरोनाने मृत्यू झाला असावा अशी भीती त्यांना वाटत होती. शेवटी मृत पतीच्या पत्नीने स्मशानात मृतदेह नेण्यासाठी हातगाडीची व्यवस्था केली. नंतर हातगाडीवर मृतदेह ठेवून मृतदेह स्मशानात नेण्यात आला.