Belgaon News : यथेच्छ मद्यपान करुन बार मालकाला खेळण्यातल्या 500 रुपयांच्या बनावट नोटा दिल्या, तिघे अटकेत
Belgaon News : बारमध्ये यथेच्छ मद्यपान करुन बिल देताना बार मालकाला मुलांच्या खेळातील पाचशे रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याची घटना बेळगावात घडली. या प्रकरणी तिघांना घटप्रभा पोलिसांनी गजाआड केलं.
Belgaon News : बारमध्ये यथेच्छ मद्यपान करुन बिल देताना बार मालकाला मुलांच्या खेळातील पाचशे रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency) देऊन फसवणूक केल्याची घटना बेळगावात (Belgaon) घडली. बनावट नोटा देऊन फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना घटप्रभा पोलिसांनी गजाआड केलं. बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी ही माहिती दिली.
बेळगावच्या गोकाक तालुक्यातील घटप्रभा शहरात ही घटना घडली. बनावट नोटा देऊन तिघांनी फसवणूक केल्याची तक्रार बार मालकाने घटप्रभा पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्याची दखल घेऊन पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या 743 बनावट नोटा जप्त केल्या. चिलमन बँक ऑफ इंडियाच्या नावाने 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यात आल्या होत्या. किरणकुमार रंगरेज, सागर निरंजन आणि शशिधर शेट्टी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
काय आहे प्रकरण?
घटप्रभा येथील बारमध्ये मंगळवारी (30 ऑगस्ट) रात्री तिघांनी यथेच्छ मद्यपान केलं. त्यानंतर बिल देताना अंधुक प्रकाशामुळे वेळ साधत बार मालकाला बनावट नोटा दिल्या होत्या. या नोटा बनावट असल्याचं समजल्यानंतर बार मालकाने पोलिसात तक्रार नोंदवली होती. बारमध्ये मंद प्रकाश असल्याने बार मालकाला काही वेळाने ग्राहकांनी आपल्याला दिलेल्या नोटा बनावट असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी बार मालकाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरु केला.
तपासाअंधी रायचूर जिल्ह्यातील सिंधनुर गावचा किरणकुमार रंगरेज, कोप्पळ जिल्ह्यातील कार टगी गावचा सागर निरंजन आणि उडुपी जिल्ह्यातील कोल्लुर येथील शशिधर शेट्टी या तिघांना बुधवारी (31 ऑगस्ट) पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी अटक करुन त्यांच्याकडून बनावट नोटा जप्त केल्या.
कर्नाटकात बनावट नोटा छापून राज्यात खपवण्याचा कट उधळला
दरम्यान चार दिवसांपूर्वीत कर्नाटकात बनावट नोटा छापून महाराष्ट्रात खपवण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळला होता. यावेळी पोलिसांनी दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. बनावट चलनी नोटा खपवण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडून दोन लाखांच्या पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. गडहिंग्लज तालुक्यातील महागावमध्ये ही कारवाई करण्यात आली. अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय 25, एकसंबा रोड, मेहबूबनगर, चिक्कोडी, जि. बेळगाव), अनिकेत शंकर हुले (20, रा. महागाव), संजय आनंदा वडर (35, सध्या रा. शिक्षक कॉलनी नेसरी, ता. गडहिंग्लज,) अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत.