Belgaon : 'दारुडा नाही तर मद्यप्रेमी असं आदराने बोला', कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीची मागणी
Belgaon : मद्यपींना समाजात सन्मानाची वागणूक दिली पाहिजे अशी मागणी कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीकडून करण्यात आलीये.
बेळगाव : बऱ्याचदा अनेक आंदोलनं चर्चेत येतात. त्या आंदोलनांमध्ये (Protest) केल्या जाणाख्या मागण्या या पूर्ण देखील होतात. त्यामुळे विविध समस्यांसाठी आंदोलनं करण ही अनेक वर्षांची परंपरा आहे. पण बेळगावात (Belgaon) एक आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरलाय. ते आंदोलन कोणत्या समस्यांसाठी किंवा कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले नाही. हे आंदोलन थेट मद्यप्रेमींनी केलं आहे. इतकचं नाही तर त्यांनी हे आंदोलन करुन काही मागण्या देखील केल्या आहेत. मद्यपींना समाजात सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. त्यांना दारुडा न बोलवता मद्यपी असं आदराने बोलावं अशा मागण्यांसाठी कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीने आंदोलन करुन केली आहे.
बरं हे आंदोलनकर्ते इतक्याच थांबले नाहीत, तर या लोकांनी कामगार मंत्री संतोष लाड यांना यासंदर्भात निवदेन देखील दिले आहे. सरकारला मद्यप्रेमींमुळे दरवर्षी छत्तीस हजार कोटी रुपयांचा कर मिळतो असा दावा या मद्यप्रेमींनी केला आहे. त्यामुळे बेळगावात या आंदोलनाच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. तसेच या आंदोलनकर्त्यांवर नेते मंडळींचा देखील हशा पिकला. नेमकं हे प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
मद्यप्रेमींचे आंदोलन
इतर वेळेस कामगार, शिक्षक, नेते मंडळींच्या आंदोलनाविषयी आपण ऐकतो. पण बेळगावातील सुवर्णसौध परिसरात मद्यप्रेंमींनी आंदोलन केले. शुक्रवार 15 डिसेंबर रोजी मद्यप्रेमींनी हे आंदोलन केल्याची माहिती समोर आलीये. बरं या मद्यप्रेंमींमुळे सरकारला जो दरवर्षी छत्तीस हजार कोटी रुपयांचा कर मिळतो त्यातील दहा टक्के रक्कम ही मद्यपींच्या कुटुंबियांसाठी आणि मद्यपी आजारी पडल्यास खर्च करावा अशी अनोखी आणि जगावेगळी मागणी या मद्यप्रेंमींनी केलीये. त्यामुळे या आंदोलनावर सध्या बरेच हास्यविनोद होत आहेत.
मद्यप्रेमींच्या मागण्या काय?
या मद्यप्रेमींनी कामगार मंत्री संतोष लाड यांना निवेदन देत मागण्या केल्या आहेत. मद्य दुकानाता छापील किंमतीपेक्षा अधिक रक्कम घेऊ नये. मद्यप्रेमी आजारी पडल्यास त्याचा वैद्यकीय खर्च सरकारने करावा. अन्य महामंडळांप्रमाणे मद्यप्रेमी कॉर्पोरेशनची स्थापना करुन मद्यप्रेमींना दिलासा द्यावा अशी मागणी कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीने केली आहे. इतक्यावरच न थांबता त्यांनी मद्यप्रेमींमुळे जो कर सरकारला मिळतो त्यामधील दहा टक्के रक्कम ही मद्यप्रेमींच्या कुटुंबियांसाठी आणि मद्यपी आजारी पडल्या खर्च करावी अशी मागणी देखील केली आहे. मद्यप्रेमी संघटनेचे हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरलंय. दरम्यान त्यांच्या मागण्या ऐकून निवदेन स्विकारणाऱ्या मंत्र्यांना देखील हसू आवरले नाही.
हेही वाचा :
85 हून अधिक देशांना मद्य पुरवणारे ललित खेतान कोण? भारतातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश