बीडच्या विडा गावातील अनोखी प्रथा, धुलिवंदनाला जावयाची गाढवावरुन मिरवणूक
बीडच्या विडा गावात जरा हटके धुळवड साजरी झाली. गावच्या जावयाला चक्क गाढवावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. एरव्ही आपला मिजाज दाखवणारा जावई धुलिवंदनाच्या दिवशी मात्र हत्ती-घोड्यावर नाही तर चक्क गाढवावर बसलेला दिसून येतो.
बीड : जावयाला मानसन्मान देण्याची आपली संस्कृती आहे. मात्र या दिवशी बीडच्या एका गावात जावयाला चक्क गाढवावर बसवलं जातं आणि गावभर मिरवलं जातं. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केल्याचे त्यांचे वंशज सांगतात.
साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या विडा गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलिवंदनाच्या दोन दिवस आधी जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमलं जातं. धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसवण्याची तयारी करण्यात येते.
यंदा मात्र अनेक तरुण जावयांनी पोबारा केल्याने गावातील ज्येष्ठ जावई दत्तात्रय गायकवाड यांची गाढवावर बसण्याकरता वर्णी लागली. जावयाची मिरवणूक संपूण गावातून वाजतगाजत काढण्यात आली. मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर देण्यात आला. विशेष म्हणजे गाढवावर बसवलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसवण्यात येत नाही. ज्या जावयाला गाढवावर बसायचा मान मिळतो तो देखील मोठ्या उत्साहात गाढवावर बसतो हे विशेषच.
एखाद्या जावयाला गाढवावर बसवले जाते आणि रंगपंचमी साजरी केली जाते हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी परजिल्ह्यातूनही नागरिक या गावात येतात. यंदाही शेकडो लोक विडा गावात आले आणि या उत्सवात सहभागी घेऊन रंगपंचमीचा आनंद लुटला
थट्टा मस्करीत सुरु झालेली ही प्रथा आता या गावची संस्कृती बनली आहे. तशी या गावात घर जावयांची संख्या मोठी आहे. साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात दीडशेपेक्षा जास्त घरजावई आहेत. मात्र हेच घरजावई धुळवड आली की गाव सोडून जातात. शेवटी काहीही झाले तरी गावकरी मात्र कोणाला कोणाला तरी पडकून अखेर गाढवावर बसवतातच. अशाप्रकारे विडा गावातील ही अनोखी परंपरा दरवर्षी साजरी होते.