बीडवासियांचं रेल्वेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार! कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी, आता रेल्वेची प्रतीक्षा
बीडच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.नगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आज कड्यापर्यंत ट्रॅकची चाचणी केली.
बीड : बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आज अहमदनगरहून कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी केली. पटरीवरून रेल्वे इंजिन धावतानाचे चित्र पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र आता रेल्वे कधी धावणार याकडे प्रतीक्षा लागली आहे.
आज दुपारच्या सुमारास झुकझुक आगीनगाडीचे इंजिन अहमदनगरवरून आष्टीच्या दिशेड मार्गस्थ झाले. त्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास या रेल्वे इंजिनचे आष्टी तालुक्यामध्ये आगमन झाले. सदरील रेल्वे इंजिन हे ट्रॅकची चाचणी करत असून येत्या काही दिवसात लवकरच हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. कडा स्थानकात रेल्वेचे इंजिन येताच अनेक बघ्यांनी इंजिन पाहण्यासाठी गर्दी केली होती.
गतवर्षी बीड जिल्ह्याच्या हद्दीवर आष्टी तालुक्यात प्रत्यक्ष 35.5 किमी अंतरावर हाय स्पीड रेल्वे रूळावर धावली. या अगोदर अहमदनगर ते नारायणडोहपर्यंत बारा किमी रेल्वेची इंजिन चाचणी घेण्यात आली होती त्यानंतर अहमदनगर ते सोलापूरवाडी 35.5 किलोमीटर अंतरावर प्रत्यक्ष रेल्वे धावली.
निधीअभावी किंवा राजकीय इच्छाशक्तीअभावी या रेल्वेचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. मागील सात वर्षांपूर्वी बीड रेल्वेसाठी भरघोष असा निधी उपलब्ध करून आला.शिवाय राज्याने देखील अर्धा वाटा उचलला. या कामासाठी माजी ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला,त्यामुळे सर्व काही शक्य झाले असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे.या रेल्वे मार्गाची मागणी फार जुनी होती. मात्र, नगर बीड परळी या 261 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचा सुरूवातीला 1995 मध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी केवळ 353 कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र, बीड-नगर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने निधी देण्यास टोलवाटोलवीच केली गेली.अनेक वर्ष हा प्रकल्प रखडल्याने या रेल्वे मार्गासाठी आता 2800 कोटीची आवश्यकता आहे. पण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव या 27 वर्षाहून अधिक काळापासून रखडलेल्या कामाकडे लक्ष दिले. त्यामुळे हे काम प्रगतीपथावर आले.