'पाच टक्के दिए तो कंबर में झुकेंगा अन् दस टक्के दिए तो लोटांगणच घालेगा’ अमर नाईकवाडे यांची संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका
गंगाधर घुमरे, फारुक पटेल, अमर नाईकवाडे यांच्यासह प्रेमचंद लोढा, नितीन लोढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेश सोहळ्यात अमर नाईकवडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीकेचे बाण सोडले
बीड : बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निष्ठावान सहकाऱ्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर अमर नाईकवाडे यांनी जहरी टीका केली आहे. स्वत:च्या बापाशी नीट बोलत नाहीत. सहकाऱ्यांवर ब्लॅकमेलिंगचे आरोप करतात. जुन्या कामाचे स्वतः श्रेय घेतात, ते डाकू आहेत. 'पाच टक्के दिए तो कंबर मे झुकेगा अन् दस टक्के दिए तो लोटांगणच घालेगा' असा आरोप करत अमर नाईकवाडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे, नगरपालिकेचे माजी गटनेते फारुक पटेल, माजी नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्यासह प्रेमचंद लोढा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष नितीन लोढा यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे नेतृत्त्व स्वीकारुन शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा परिषदेसमोर झालेल्या प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची उपस्थिती होती
संपूर्ण भाषणादरम्यान अमर नाईकवाडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर याना तीन चॅलेंज दिले.
चॅलेंज एक - विकासपुरुष असाल तर दारातला रस्ता करा.
चॅलेंज दोन - आमदारांनी मराठी भाषेतून आठ ओळीचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दाखवलं तर मी राजकारण सोडेन..
चॅलेंज तीन - सर्वच्या सर्व बावन्न निर्व्यसनी उमेदवारांना नगरपालिकेत तिकीट देऊन दाखवा
बीडमध्ये झालेल्या या प्रवेश सोहळ्याला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खैरे यांनी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कायम गुंगीत असलेल्या लोकांनी आणि आघाडीसोबत असलेल्या नेत्यांनी शिवसैनिकांना त्रास देऊ नये, असा इशारा देखील यावेळी खैरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.
विकासनिधीवरुन नगराध्यक्षांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कान टोचले
बीड नगरपालिकेला विकासनिधी दिला जात नाही यावरुन बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पुन्हा एकदा तोफ डागली. "आमच्या कामावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. परंतु इतर नगरपालिकांना मिळणारा निधी आणि बीड नगरपालिकेला मिळणारा निधी हा इतरत्र वळवला जातो, त्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी योग्य निर्णय घ्यावा, अशी भावना यावेळी क्षीरसागर यांनी व्यक्त केली. आम्ही आणलेला निधी आणि आम्ही केलेली कामं याचं श्रेय घेण्याचे काम सध्या आमदार करत आहेत, असंही भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितलं.
'कालिक अपने मुंह को लगी है.. लेकिन आप आईना साफ कर रहे हो' जयदत्त क्षीरसागर यांची शायरीतून संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका
राष्ट्रवादीच्या पाच खंद्या समर्थकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी देर आये दुरुस्त आहे असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी पूर्वी आपल्यासोबत असलेल्या या पाच कार्यकर्त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत केलं. हे पाच राष्ट्रवादीचे समर्थक शिवसेनेमध्ये आल्यामुळे आता बॅटिंग, फील्डिंग आणि बॉलिंग करण्यासाठी आपल्याला मैदान मोकळ झालं असून आपण विरोधकांच्या विकेट घेऊ शकतो. आपण कधी सुडाचं आणि बदला घेण्याचं राजकारण लोकशाहीमध्ये केलं नाही. त्यामुळे येत्या काळात प्रवेश करणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असा विश्वास यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी या कार्यकर्त्यांना दिला आहे.
पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यावर शेरोशायरीच्या माध्यमातून टीका देखील केली. 'कालिक अपने मुंह को लगी है लेकिन आप आईना साफ कर रहे हो,' अशा शब्दात टीका करत त्यांनी आपल्याला आता पुनश्च हरि ओम करायचं असून नव्याने सुरुवात होणार असल्याचे संकेत दिले
या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर च्या सगळ्या नेत्यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाली. नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनीसुद्धा संदीप क्षीरसागर यांच्यावर आगामी नगरपालिका निवडणूकीतील संघर्ष किती टोकाचा असेल हेच अधोरेखित केलं.