Beed: माझ्या मुलाला मोबाईल का विकला? जाब विचारत केलेल्या मारहाणीत 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
मोबाईल का विकला या शुल्लक कारणावरुन जाब विचारत एका 14 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याने त्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
बीड: आपल्या मुलाला मोबाईल का विकला असा जाब विचारत काकाने त्याच्या 14 वर्षाच्या पुतण्याला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. लहू लिंबराज खिळदकर असे मृत युवकाचे नाव असून आरोपी राजू खिळदकर यास ताब्यात घेतले आहे. एकाच गावात आणी जवळच्या भावकीतील नातेसंबंध असतानाही ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मृत आणि आरोपी हे नात्याने भावकीतून काका-पुतण्या आहेत.
मोबाईल विकल्याचे ठरले मृत्यूला कारण..
बीडच्या आष्टी तालुक्यातील नांदुर या गावातील लहू खिळदकरने त्याच्या भावकीतील राजू खिळदकरच्या मुलाला मोबाईल विकला. मात्र, यामुळे राजू खिळदकर संतप्त झाला. त्याने लहूला घरी बोलावून घेतले. आपल्या मुलाला मोबाईल का विकला, असा जाब विचारत राजूने लहूला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतील लहूला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसापासून लहू नगरच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता मात्र अखेर आज सकाळी त्याचा संघर्ष थांबला आणि उपचारादरम्यान लहूचा मृत्यू झाला.
अंभोरा पोलीस ठाण्यात मृत युवकाचे वडील लिंबराज झुंबर खिळदकर यांच्या फिर्यादीवरून राजू खिळदकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारा तासांत पोलिसांनी आरोपीला पकडले..
पोलिसांनी तपास करत अवघ्या 12 तासांमध्ये आरोपीस ताब्यात घेतले आहे. या घटनेतील आरोपी राजू खिळदकर हा गावातून पसार झाला होता. आरोपीविरोधात गुन्हा दाखल होताच अंभोरा पोलिसांनी राजू खिळदकर याला शोधासाठी पथक बनवले होते. मात्र तो पर्यंत तो गावातून पसार झालेला होता. आरोपी हा नगर जिल्ह्यामध्ये असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. घटनेनंतर बारा तासात पोलिसांनी आरोपी राजू खिळदकरला ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
























