Beed News : सिलेंडरच्या स्फोटानंतर रेग्युलेटर उडून छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू, बहिण-भावाला दिले जीवदान
गॅस टाकीचा स्फोट झाल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीड (Beed Cylinder Blast News) जिल्ह्यात घडली आहे.
Beed Cylinder Blast News : धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथे शेत वस्तीवरील दोन घरांना अचानक आग लागली. आग विझवत असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.
गंभीर मार लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
आग विझवण्यासाठी हातात पाण्याची बादली घेऊन फेकत असतानाच आगीमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर यावेळी सिलेंडरचे उडालेले रेगुलेटर हे छातीत घुसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. रवी तिडके असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. धारुर तालुक्यातील पिंपरवाडा इथं ही हृदयद्रावक घटना घडली आहे. धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथे शेत वस्तीवरील दोन घरांना अचानक आग लागली. आग विझवत असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाल्याने या स्फोटामध्ये रवी श्रीहरी तिडके वय 21 यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पिंपरवाडा गावापासून अर्धा किमी अंतरावर उत्तरेस श्रीहरी कारभारी तिडके व रामकिसन कारभारी तिडके यांचे शेतात पत्राचे शेड व गोठा आहे. या गोठ्यास दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी श्रीहरी तिडके यांचा मुलगा रवी तिडके हा येथील जवळील टाकीतील पाणी घेऊन विझवत असताना अचानक घरातील गॅस टाकीचा स्फोट झाला.
लहान भाऊ बहिण घराबाहेर पडले म्हणून वाचले...
उन्हाचा पारा वाढत असतानाच अचानक शेतामध्ये असलेल्या घरातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. आग इतकी भीषण होती की परिसरातील लोक या गावी जाण्यासाठी धावपळ करत होते, यावेळी घरामध्ये रवी तिडके आणि त्याचा लहान भाऊ आणि बहीण असे तिघे जण बसले होते, आग लागताच बहीण भावाला रवीने बाहेर काढले, त्यामुळे त्यांना या आगीची झळ बसली नाही.
पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
श्रीहरी तिडके व रामकिसन तिडके या दोन ऊसतोड कामगारांची भावाचे पत्र्याच्या शेड मध्ये या ठिकाणी घर होते. त्या शेजारीच गोठा होता, या ठिकाणी दोन्ही कुटुंब मागच्या अनेक दिवसापासून राहत होते. सुरुवातीला रामकिसन तिडके यांच्या घराला आग लागली, त्यानंतर गोठ्याला आग लागली. आग विझवण्यासाठी रवी तिडके हा गोठ्या जवळील ड्रममध्ये भरून ठेवलेले पाणी बादलीमध्ये भरतानाच सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि त्यात रवीचा मृत्यू झाला. याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आलेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :