Anjali Damania : 'जो माणूस स्वत: महिलांना त्रास देतो त्याला…', बीडमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Anjali Damiana on Beed Crime : आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बीड : बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून, या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) चौकशी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने तपास एसआयटीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट करत, आज दुपारी 2 वाजता विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
अंजली दमानिया यांच्या ट्वीटमध्ये काय?
इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली? आज दुपारी 2 वाजता मी विधानपरिषदे च्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट, विधान भवनात येऊन घेणार आहे. काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाश्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात? बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणस आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही.
वैष्णवीच्या केस मधे मी तिच्या आईवडिलांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा एक महिन्याने फ़ास्ट ट्रैक वर केस केली. ही केस मुख्यमंत्र्यांनी का तत्काळ फ़ास्ट ट्रैक वर केली नाही? सगळ्या महिला आमदारांनी ह्याचा विरोध करायला हवा. महिलांच्या सगळ्या प्रश्नांची दाखल ही तत्काळ घेतली गेली पाहिजे, पण ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घ्यावी. धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा हक्क नाही, असंही पुढे दमानियांनी म्हटलं आहे.
इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी SIT जाहीर केली?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 2, 2025
आज दुपारी २ वाजता मी विधानपरिषदे च्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची भेट, विधान भवनात येऊन घेणार आहे.
काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाश्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना…
नेमकं प्रकरण काय?
खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड (Beed News) शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. सदर प्रकरणानंतर पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सदर घटनेच्या निषेधार्थ बीडमधील कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले असून कोचिंग क्लासेस परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना केले आहे.
आरोपी शिक्षक आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय
विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून विजय पवार याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर आरोपी शिक्षक विजय पवार हा विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असून त्याचे अनेक फोटो सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.






















