Baramati News : बारामती जेजुरी रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू,संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
Baramati News : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. तब्बल चार तासांहून अधिक काळ नातेवाईकांनी मृतदेह पोलीस चौकीत ठेवले होते.
Baramati News Update : बारामती जेजुरी रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. बाळासाहेब कोलते आणि सविता कोलते अशी मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. मयत कोलते दाम्पत्य हे पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावचे रहिवासी होते.
अपघातानंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेऊन सोडून दिले, असा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर मृतदेह ठेवून पोलीस चौकीला घेराव घातला. तब्बल चार तासांहून अधिक काळ मृतदेह पोलीस चौकीबाहेर ठेवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बारामती जेजुरी रस्त्यावर आंबी गावच्या हद्दीत भरधाव कारने कोलते यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, या अपघातात कोलते दाम्पत्य जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थीळी धाव घेतील. मात्र, अपघातानंतर मोरगाव पोलिसांनी कारचालक दत्तात्रय साळुंके याला तत्काळ ताब्यात घेतले. परंतु, काळी वेळात त्याला सोडून देण्यात आले, असा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मोरगाव पोलीस चौकीत गर्दी केली. कार चालक आणि त्याला सोडून दिलेल्या पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय पोलीस ठाण्यासमरोरून उठणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.
यावेळी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह पोलीस चौकीसमोर आणून ठेवले. तब्बल चार तासांहून अधिक काळ नातेवाईकांनी मृतदेह पोलीस चौकीत ठेवले होते. कारवाई झाल्याशिवाय पोलीस ठाण्यासमोरून कोणत्याही परिस्थित हालणार नाही असा आक्रमक पवित्रा कोलते यांच्या नातेवाईकांनी घेतला. काळी वेळानंतर पोलीस उपअधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे पोलीस उप विभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नातेवाईकांनी कोलते दाप्पत्याचे मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या मुळ गावी नेहले.