(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baramati : बारामतीच्या राजकारणाला वेग! अजित पवार सक्रिय तर शरद पवारांच्या भेटीगाठी सुरू
Baramati Lok Sabha Election : अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी राजकीय भेटीगाठी सुरू केल्या आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे याही सक्रिय झाल्याचं दिसून येतंय.
पुणे : बारामती, महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात वेगळे रंग भरणारा मतदारसंघ. यंदा मात्र बारामतीची ही माती काहीशी बावरलीय. बारामतीतले मतदार बुचकळ्यात पडलेत, कारण ज्या मातीने फक्त पवारांच्या माथी विजयाचा गुलाल लावला, ज्या बारामतीकरांनी फक्त पवारांच्या गळ्यात विजयाचे हार घातले, त्याच पवार घराण्यात पहिल्यांदाच सर्वात मोठी राजकीय फूट पडलीय. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे नात्याने बहीण-भाऊ. आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात म्हणाल तर एकमेकांची ढाल. मात्र आता याच ताई आणि भावाने एकमेकांविरोधात राजकीय तलवारी उगारल्या आहेत. ज्या मैदानात दादा सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरायचे, ज्या मैदानात दादांनी ताईंच्या विजयासाठी जीवाचं रान केलं, आज त्याच मैदानात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार व्हाया सुनेत्रा पवार असा वाद उभा राहिल्याचं दिसून येतंय.
सु्प्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार सामना रंगणार (Supriya Sule Vs Sunetra Pawar)
बारामतीच्या मैदानात पवारांची लेक विरुद्ध पवारांची सून आमनेसामने उभी ठाकण्याची दाट शक्यता आहे.सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार रिंगणात उतरण्यार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं महाराष्ट्रात मिशन 48 चा नारा दिला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकेका लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतंय. यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळं महायुतीत असलेल्या अजित पवारांनीही बारामतीची निवडणूक गांभीर्यानं घेतली आहे. त्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केलीय.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विकासकामांचा रथ फिरतोय. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणाऱ्या विकासरथानंही एन्ट्री केली. गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचे दौरे सुरू झाले आहेत. मागच्या आठवड्यात सुनेत्रा पवार यांनी दौंडचे भाजप आमदार राहूल कुल यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार या महिलांना साद घालतानाही दिसून येत आहेत.
शरद पवारांच्याही भेटीगाठी सुरू
दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल यांचं कौतुक केलंय. सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी जुन्या जाणत्या नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायलाही सुरुवात केली आहे. तर शनिवारी शरद पवारांनी बारामतीत पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली. तर शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे काटेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात चंद्रराव तावरे यांच्यासोबत एकाच मंचावरती दिसल्या.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत.एन्व्हायरमेंटल फार्म ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत. ग्राम स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून त्या मतदारसंघात सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रातही त्यांचा वावर दिसून येतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या सिनेट सदस्य आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेवर विश्वस्त आहेत.
ही बातमी वाचा: