(Source: ECI/ABP News/ABP Majha)
''बप्पा, मी फोन ऑपरेटर बनल्यावर कॉल डिटेल्सपण बाहेर येतील''; बजरंग सोनवणे अन् मिटकरींमध्ये जुंपली
बजरंग सोनवणेंचा अजित पवारांना फोन आला होता, त्यावरुन अजित पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी महत्त्वाची व्यक्ती आहेत हे सिद्ध झाल्याचं अमोल मिटकरींनी म्हटलं होतं
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये किंवा आमदार, खासदारांमध्ये सातत्याने खटक उडत असल्याचे दिसून येते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सोशल मीडियातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांना डिवचत असतात, त्यांवर टीका करतात. त्यानंतर, अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनाही शरद पवार पक्षाकडून प्रत्युत्तर दिलं जातं. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. अमोल मिटकरींनी एक ट्विट करुन बजरंग सोनवणे यांचा अजित पवारांना फोन आल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये सोशल वॉर सुरू झाल्याचं दिसत आहेत. बजरंग सोनवणेंनी (Bajrang Sonavane) आज अमोल मिटकरींचा उल्लेख करताना, टेलिफोन ऑपरेटर असे म्हटले. त्यावरुन, आता मिटकरींनीही पलटवार केला आहे.
बजरंग सोनवणेंचा अजित पवारांना फोन आला होता, त्यावरुन अजित पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी महत्त्वाची व्यक्ती आहेत हे सिद्ध झाल्याचं अमोल मिटकरींनी म्हटलं होतं. तसेच, विधानसभा निवडणुकांपूर्वी आगे आगे देखो.. होता है क्या.. असेही मिटकरींनी म्हटले होते. त्यानंतर, बजरंग सोनवणेंनी स्पष्टीकरण दिले. तसेच, अमोल मिटकरी हे फोन ऑपरेटर आहेत का, ज्यांना प्रत्येक कॉलची माहिती आहे, असे बजरंग सोनवणेंनी म्हटले होते. त्यानंतर, अमोल मिटकरींनीही ट्विट करुन पलटवार केला आहे.
बप्पा म्हणले मिटकरी देवगिरीवरचा ऑपरेटर आहे.! बप्पा, दादांनी मला ऑपरेटर बनवलं तर मी माझं भाग्य समजेल.पण बप्पा ऑपरेटर बनल्यावर किती फोन खणाणले याचे कॉल डिटेल्स पण बाहेर येतील. आज कुणाचा फोन खणाणला आत्ता सांगत नाही मात्र तुमचा कालचा आवाज उपस्थित बिडकरांनी पण योगायोगाने ऐकलाय😄
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 12, 2024
बप्पा म्हणाले मिटकरी देवगिरीवरचा ऑपरेटर आहे.! बप्पा, दादांनी मला ऑपरेटर बनवलं तर मी माझं भाग्य समजेल.पण, बप्पा ऑपरेटर बनल्यावर किती फोन खणाणले याचे कॉल डिटेल्स पण बाहेर येतील. आज कुणाचा फोन खणाणला आत्ता सांगत नाही. मात्र तुमचा कालचा आवाज उपस्थित बिडकरांनी पण योगायोगाने ऐकलाय, असे म्हणत मिटकरींनी बजरंग सोनवणेंना इशाराच दिला.
काय म्हणाले होते बजरंग सोनवणे
अमोल मिटकरी काय देवगिरी बंगल्यावर फोन ऑपरेटर आहेत का, कारण फोनची माहिती ही केवळ फोन ऑपरेटरलाच असते, असा टोलाही सोनवणेंनी मिटकरींना लगावला होता. तसेच, शरद पवार साहेबांचे आठ खासदार राज्यभरात निवडून आले आहेत. माझ्यासारखा एखादा आमदार इतर कोणाच्या संपर्कात गेला तर त्याला पब्लिक तर मारेलच... घरात माझे वडील मारतील, माझी बायको मला नाश्ता द्यायची नाही, उलट ज्यांचा एखादा खासदार आहे, त्यांना शरद पवारांच्या संपर्कात येता येईल. यांच्यावर काय बोलायचं, असे सोनवणे यांनी म्हटले. अमोल मिटकरी हे काही दिग्गज नाव नाही. त्याने ट्वीट करावं आणि मी दखल घ्यावी... दखलपात्र माणसाची दखल घेतली जाते, असा टोला बजरंग सोनवणे यांनी लगावला होता.
काय म्हणाले होते अमोल मिटकरी
अमोल मिटकरींनी आपल्या ट्विटमध्येम्हटले होते की, एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा दिसतोय, बोलतोय लवकर मोठा पिक्चर तुम्हाला दिसेल. यावरुन अजित पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी महत्त्वाची व्यक्ती आहे, हे सिद्ध होत आहे. एखाद्याच्या साखर कारखान्याचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो दादांना विनंती करत असेल तर माझ्यासारख्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ही भूषणावाह बाब आहे. आज तुम्ही ट्रेलर पाहिला आता विरोधकांकडून स्पष्टीकरण साहजिक आहे. आता आम्ही पण वाट पाहतो की, ते काय स्पष्टीकरण देतात. आमचे चुकीचे असेल संबंधित नेत्यांते कॉल डिटेल्स काढा तुम्हाला कळेल. दुपारी देखील फोन येऊन गेल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी तुम्ही बघा आगे, आगे देखो होता है क्या? असे मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
हेही वाचा
मोठी बातमी : अजितदादांना फोन केल्याचा दावा, बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरींना एका वाक्यात सुनावलं!