Ramesh Kadam : अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी रमेश कदमांना जामीन मंजूर, पण तुरूंगातून सुटका नाही कारण...
Annabhau Sathe Mahamandal scam case : अण्णाभाऊसाठे महामंडळ घोटाळा प्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी अन्य प्रकरणांमध्येही अटक असल्यामुळे त्यांची तूर्तास जेलमधून सुटका होणार नाही.
मुंबई : अण्णाभाऊसाठे महामंडळ घोटाळा प्रकरणी (Annabhau Sathe Mahamandal scam case ) माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam ) यांना तब्बल आठ वर्षांनी जामीन मंजूर झाला आहे. 1 लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रमेश कदम यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. परंतु, जामीन मंजूर झाला असला तरी अन्य प्रकरणांमध्येही अटक असल्यामुळे रमेश कदम यांची तूर्तास जेलमधून सुटका होणार नाही. रमेश कदम यांनी तपासात सहकार्य करावं, शिवाय मुंबई-ठाणे हद्द न सोडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी आहेत. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी रमेश कदम यांना आठ वर्षापूर्वी अटक केली होती. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. डिसेंबर 2018 मध्ये कारागृहातील असभ्य वर्तन आणि संबंधित खटल्यातील साक्षीदारांचं संरक्षण या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयानं आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यानच्या काळात या ना त्या कारणानं रमेश कदम सतत चर्चेत राहिलेत. मागे एका व्हिडीओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं. त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र, 'पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली' असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते. परंतु, मागील वर्षी मार्च महिन्यात रमेश कदम शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्त झाले. रमेश कदम यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे.
काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा?
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना ऑगस्ट, 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. पहिल्यांदा त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना भायखळ्याच्या पुरुष कारागृहात हलवण्यात आलं. अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला होता.
काय आहेत आरोप?
– कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती
– उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं
– नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.
– अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या
– लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले
– महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्री वाटण्यात आले
– विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप