(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिवंडीत 22 तारखेला मांस मच्छीची दुकानं बंद, आयुक्तांचे आदेश; पुण्यातही मटण, चिकन विक्री बंद, व्यावसायिकांचा निर्णय
भिवंडीमध्ये (Bhiwandi) मांस आणि मच्छीची विक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात सध्या एकच उत्साहाचा विषय आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचलीये. त्याच पार्श्वभूमीवर भिवंडीमध्ये (Bhiwandi) मांस आणि मच्छीची विक्री करणारे सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेत. यासंदर्भातले एक परिपत्रक देखील त्यांनी जारी केले आहे. भिवंडीसह पुण्यातही (Pune) 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यावसायिक सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
सोहळ्यानिमित्त मिठाई वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र हिंदूखाटीक मटण व्यवसाईक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी जाहीर केले आहे . 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जातोय. त्यामुळे सर्व मटण विक्री व्यवहार बंद करुन या सोहळ्यात आनंदाने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
22 जानेवारीला महाराष्ट्र सरकारकडून सुट्टी जाहीर
महाराष्ट्रतही 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आलीये. सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचसाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
केंद्र सरकारकडून हाफ डे देण्याचा निर्णय
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्माचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की, अयोध्येमधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साह साजरा केला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.