(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raosaheb Danve : चंद्रकांत खैरे ही भागवत कराडांची शिकार, मी मारणार नाही; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य
Aurangabad Water Issue : चंद्रकात खैरे हे एन्जॉय करण्याचा विषय असल्याचं केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले. तर कराडांना मी नगरसेवक केल्याचं खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
औरंगाबाद: शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे ही केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराडांची शिकार आहे, मी ती मारणार नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. तर खैरे हे एन्जॉय करण्याचा विषय आहे, आपण त्यांना सिरिअसली घेत नसल्याचं केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
चंद्रकांत खैरे हे काहीही बोलत राहतात, त्यांना जास्त काही सिरिअरली घ्यायची गरज नाही असं केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले. त्यांचे कोणतेही वक्तव्यं आलं की आम्ही हसत बसतो, खैरे हे एन्जॉय करण्याचा विषय आहेत, कारण ते तथ्यहीन आरोप करतात असं डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं.
भाजपकडून उद्या औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. भाजपने या मोर्चासाठी पैसे देऊन माणसे आणल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना डॉ. भागवत कराड यांनी आणि रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिलं आहे.
भागवत यांना मी नगरसेवक केलं; चंद्रकांत खैरे यांचे प्रत्युत्तर
या टीकेला उत्तर देताना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, "भागवत कराड यांना मी नगरसेवक केलं, त्यांना दोनदा महापौर केलं, त्यांचं नशिब मोठं म्हणून त्यांना मंत्रिपद मिळालं. पण त्यांना किती अधिकार आहेत हे माहिती आहे. त्यांच्याकडे गेले तर कुणाचं काम होत नाही. त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत, पंकजा मुंडे यांना त्रास देण्यासाठी त्यांना खासदार केलं, मंत्री केलं."
औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला असून यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. 23 तारखेला भाजपकडून भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढला जाणार आहे. शहरातील पाणी प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.