Aurangabad : औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील 'राजा' बिबट्याचा मृत्यू
Siddharth Zoo News: राजा बिबट्याला हेमलकसा गडचिरोली येथुन 2016 मध्ये प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते.
Siddharth Zoo News: औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation) सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील (Siddhartha Udyan Zoological Museum) एका नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे. राजा असे या बिबट्याचे नाव असून, त्याचे वय 15 वर्षे होते. 16 ऑगस्ट रोजी रात्री तो मृत पावला आहे. राजा बिबट्या मागील दोन महिन्यांपासून आजारी होता. राजा बिबट्याला हेमलकसा गडचिरोली येथून 2016 मध्ये प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते. त्यावेळेस त्याचे वय अंदाजे 7 ते 8 वर्षे इतके होते. त्याचा प्राणीसंग्रहालयामध्ये 7 वर्षे वावर होता.
मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या राजावर प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांचेमार्फत प्रतिदिनी उपचार करण्यात येत होते. या बिबट्याचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता अहवालानुसार आजारी बिबट्यावर उपचार करण्यात येत होते. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी रात्री राजाने अखेरचा श्वास घेतला. या बिबट्याचे शवविच्छेदन आज (17 ऑगस्ट) रोजी सकाळी डॉ. अमितकुमार दुबे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. रोहीत धुमाळ, व डॉ. महेश पवार पशुधन विकास अधिकारी, शासकीय पशुसर्व चिकित्सालय यांनी केले.
तर, मृत बिबट्याच्या शवाची विल्हेवाट लावण्याकरता श्री. डी. बी. तौर वनपरिक्षेत्र अधिकारी व श्री. ए. डी. तांगड वन परिमंडल अधिकारी यांची उपस्थिती होती. यांचे समक्ष मृत बिबट्याचे शरीर जाळण्यात आले व घटनेचा पंचनामा करण्यात आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार बिबट्याचा मृत्यू Multi Organ failure ने झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती प्र. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
मागच्या महिन्यात 'समृद्धी'ने दिला होता गोंडस बछड्यास जन्म
दरम्यान काही दिवसांपूर्वी याच औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील पिवळे वाघ समृद्धी हिने एका गोंडस बछड्याला जन्म दिला होता. समृद्धीने 19 जुलै रोजी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान एका बछड्यास जन्म दिलेला होता. समृद्धी वाघीण आणि बछड्याची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांच्यामार्फत करण्यात आली होती. दोघांची तब्येत सुदृढ होती. विशेष म्हणजे सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघाच्या जोडीने प्रथम वेळी 12 नोव्हेंबर 2016 रोजी तीन पिवळे, एक पांढऱ्या बछड्यास जन्म दिला होता. दुसऱ्या वेळी 16 एप्रिल 2019 रोजी चार बछड्यांना जन्म दिला होता, ज्यात दोन पिवळे तर दोन पांढरे होते. तिसऱ्या वेळी 25 डिसेंबर 2020 रोजी पाच पिवळ्या बछड्यांना जन्म दिला होते. त्यानंतर आता तीन वर्षांनी आज 19 जुलै 2023 रोजी चौथ्यावेळी एका बछड्यास जन्म दिला आहे. तर आतापर्यंत जन्म झालेल्या या वाघांमधील एक जोडी पुणे प्राणीसंग्रहालय येथे तर दोन पिवळे वाघ मादी हे अहमदाबाद प्राणीसंग्रहालय येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad News : औरंगाबाद 'सेफ्टी टँक मुक्त' शहर म्हणून ओळखले जाणार; महानगरपालिका राबवणार उप्रकम