(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भक्तांमध्ये भेद नाही! आषाढीला व्हीआयपी दर्शन बंदच, महापूजेच्यावेळीही पासेस कमी करणार; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
दर्शन रांगेतील भाविकांना 15 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्यावेळी होणारी व्हीआयपी गर्दी (Pandharpur Ashadhi Wari 2024) टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले . वास्तविक मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने जास्त व्हीआयपी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरे जावे लागते यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापुजेला मर्यादित व्हीआयपींना प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी Abp माझाशी बोलताना सांगितले . याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
आषाढी यात्राकाळात दर्शन रांगेत हजारो भाविक असताना बंद केलेले व्हीआयपी दर्शन हे बंदच राहणार असून सर्वसामान्य भाविकांना झटपट दर्शन मिळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची खंबीर भूमिका सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माझाशी बोलताना व्यक्त केली. Abp माझाने याबाबत वृत्त दाखविल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत सर्वच बड्या व्हीआयपी व्यक्तींनाही झटपट दर्शन देण्यास मनाई केल्याने बाकीचे घुसखोरी करणारे तथाकथित व्हीआयपी यांची घुसखोरी बंद झाली. यामुळेच 15 तास रांगेत उभं राहणारे भाविक केवळ 4 ते 5 तासात आता देवाच्या पायापर्यंत पोहचत आहेत. याच पद्धतीने भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. दर्शन रांगेतील भाविकांना 15 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले .
15 जुलै रोजी अखेरच्या मुक्कामासाठी वाखरी
Abp माझाने समोर आणलेल्या वाखरी ते पंढरपूर या रखडलेल्या पालखी मार्गाबाबत जिल्हाधिकारी गंभीर असून या ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याना सोबत घेऊन धोकादायक ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले . येत्या दोन दिवसात कोणत्याही परिस्थितीत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याच मार्गाबाबत सातत्याने माझाने भाविकांचे हाल व धोके टाळण्यासाठी काम पूर्ण करण्यावर आवाज उठविला होता. पालखी सोहळे 15 जुलै रोजी अखेरच्या मुक्कामासाठी वाखरी येथे येणार असून त्यापूर्वी हा मार्ग पूर्ण करून घेणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
हे ही वाचा :
राजकारण्यांना विठ्ठलाची गोडी, राहुल गांधीही वारीत होणार सहभागी