(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari : माऊलींची पालखी आज वेळापूर मुक्कामी तर संत तुकाराम महाराजांचा बोरगाव येथे मुक्काम
माऊलींच्या पालखीचा आज वेळापूर येथे मुक्काम असणार आहे. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज बोरगावला मुक्कामी आहे.
Ashadhi Wari 2022 : पंढरपुरचा विठ्ठल हा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहोत. दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. माऊलींच्या पालखीचा आज वेळापूर येथे मुक्काम असणार आहे. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज बोरगावला मुक्कामी आहे.
माऊलींची पालखी आज वेळापूरमध्ये मुक्कामी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण वेळापूर जवळच्या खुडूस फाटा इथं पार पडलं. काल या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण मैदानात चिखलाचं साम्राज्य होतं. मात्र चिखल तुडवत मोठ्या दिमाखात हा रिंगण सोहळा पार पडला. वरूणराजाने लावलेली हजेरी त्यात खाली चिखल तुडवत वारकऱ्यांनी हे रिंगण पूर्ण केले. यावेळी माऊलींचा अश्व वायू वेगाने धावला आणि ज्ञानोबा तुकोबाचा एकच जयघोष झाला. मंडळी असं म्हणतात की, ऊन वारा पाऊस असं काहीही वारकऱ्यांना अडवू शकत नाही त्याचा प्रत्यय आज वेळापूर जवळ आला. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज वेळापूरमध्ये मुक्कामी आहे.
सदाशिवनगरमध्ये तुकाराम महाराजांचे उभे रिंगण
तुकोबांची पालखी अकलूजहून निघून बोरगावला मुक्कामी असणार. तर तुकोबाच्या पालखीचं सदाशिवनग मध्ये येथे उभं रिंगण पार पडले. कोरोनामुळं गेली दोन वर्ष मोजक्याच वारकऱ्यांच्या सोहळ्यात पालखी सोहळा पार पडला. मात्र यंदाची आषाढी कोरोना निर्बंधमुक्त असल्यानं यावर्षी वारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. पालखी मार्गात अनेक अडचणी आल्या तरी विठुरायाच्या ओढीने यावर मात करीत हे भाविक पंढरीच्या दिशेने निघाले आहेत.
10 जुलैला आषाढी एकादशी
अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. . संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करुन पालख्या 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे.