मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आषाढीनिमित्त रविवारी पहाटे विठ्ठलाची महापूजा, विविध कार्यक्रमांनाही राहणार उपस्थित
Ashadhi wari 2022 : रविवारी पाहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकरीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi wari 2022) पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे आज रात्री साडेआठ वाजता गृहमंत्री अमित शाह यांना भेटतील आणि उद्या सांयकाळी साडेचार वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दिल्ली दौरा आटोपून मुख्यमंत्री शनिवारी पुण्यात पोहोचतील. तेथून ते रस्ते मार्गाने पंढरपूरला जातील. शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान ते पंढरपुरात पोहोचतील. त्यानंतर पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थित राहतील.
रविवारी मध्यरात्री अडीच ते पहाटे साडेचार या वेळीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा होईल. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन होईल. नंतर पहाटे पावणे सहा वाजता चंद्रभागा नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी सकाळी सव्वा आकरा वाजता पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर पावणे बारा वाजता पंचायत समिती पंढरपूर येथे 'स्वच्छता दिंडी' या कार्यक्रमाच्य समारोपास उपस्थित राहतील त्यानंतर साडे बारा वाजता पंढरपुरात होणाऱ्या पक्ष मेळाव्यास उपस्थित राहतील.
पंढरपुरातील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री रविवारी दुपारी तीन वाजता सोलापूर विमानतळाकडे रवाना होतील आणि तेथून शासकीय विमानाने मुंबईला येतील. सायंकाळी साडेचार वाजता मुंबई विमानतळ येथे पोहोचतील, तेथून ठाण्याला जातील.