(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Ekadashi 2022 : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा!
Ashadhi Ekadashi 2022 : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली.
Ashadhi Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत.
मुख्यमंत्री सहकुटुंब हजर
विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.
विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांचा पुढील कार्यक्रम
विठूरायाची पूजा संपन्न झाल्यानंतर पहाटे 5.30 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन
पहाटे 5.45 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण
सकाळी 11.15 वाजता - शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ
सकाळी 11.45 वाजता- पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम
कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा भाविकांना आणि वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचे थेट दर्शन घेता येणार आहे. विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे.
हेही वाचा :