Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
आशा भोसले यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडले.
Asha Bhosle : माझ्या आयुष्यात कधी असं पुस्तक प्रकाशित होईल असं मला कधी कल्पनाही नव्हती, माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा, अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी काळजाला हात घातला. आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन आज (28 जून) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडले. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलारही उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आशा भोसलेंच्या अनेक आठवणी जागवल्या. गायक सोनू निगमने पाद्यपूजन करत आशाताईंना अभिवादन केले.
आशाताईंनी लता दिदींच्या आठवणींना उजाळा दिला
यावेळी बोलताना आशाताई भोसले यांनी लता दिदींच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की दीदीच्या नावाशिवाय हा कार्यक्रम संपता कामा नये. मी घरातील तिसरी बहीण आहे. आमचा एक पांडव गेला तरीही मी अजून आहे. मला घरी भीम म्हणायचे. मोगरा फुलला गाणं दीदीच्या मुखात छान वाटतं होतं. तिने आम्हाला सांभाळलं आणि अजूनही सांभाळते आहे.
60 वर्षांची असताना मी साडे अकरा हजार गाणी गायली
त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या आयुष्यात कधी असं पुस्तक प्रकाशित होईल, असं मला कधी कल्पनाही नव्हती. त्यांनी सांगितले की, मिकी कॉन्ट्रॅक्टर नावाचे मेकअप मन आहेत मी आयुष्यात पहिल्यांदा मेकअप केला तेव्हा मी चिडले. त्यानंतर तो म्हणाला पूर्ण झाला की बघा. विश्वास नेरूरकर यांनी माझ्या आयुष्यात फार मोठं काम केलं आहे. माईकसमोर आल्यावर घसा कोरडा पडतो. 60 वर्षांची असताना मी साडे अकरा हजार गाणी गायली होती. जगात सगळ्यात जास्त रेकॉर्ड माझा आवाज आहे असं म्हणतात. मी सर्व सहकाऱ्यांना प्रणाम करते, मी या वयात बोलले नाही तर कधी बोलणार? थोडं सहन करा. असेही त्यांनी सांगितले.
मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले
मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते. माझी आई त्यांना जेवण द्यायला जायची. दादरला त्यांच्या घरी आम्ही यायचो. त्यांनी मला विचारलं तू दीनानाथसारखी गातेस का? तेव्हा मी हो म्हटलं, पण त्यांच्यासारखं गायच म्हणजे काय? मी गायले आणि ते म्हणाले आणखी प्रॅक्टिस केलं पाहिजे, अशी आठवण आशाताईंनी सांगितली.
आशाताईंच्या गाण्यामुळे जीवन समृद्ध : मोहन भागवत
आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आशाताईंचे भरभरून कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, आशाताईंच्या गाण्यामुळे आपलं जीवन समृद्ध झालेलं आहे. संगीताची परंपरा महत्त्वाची असते. असं संगीत आपल्याला मिळालेलं आहे आणि ते मिळत राहावं अशी आपली सर्वांची इच्छा आहे. तुमचं गाणं हे केवळ तुमचं गाणं नाही, तर ते देशभरात पसरलेल्या सर्व रसिकांचे गाणं आहे. आणि ते सर्वसामान्यांचे सुद्धा गाणं आहे. उद्या इतिहास लिहिला गेला, तर त्यामध्ये भारतातील लोकांना ऐकलेले संगीत या विषयावरही लिहावं लागेल. त्यामध्ये मंगेशकर कुटुंबाच मोठं स्थान आहे हे नाकारून चालणार नाही.
पंडित हृदयनाथ मंगेशकर काय म्हणाले?
हृदयनाथ मंगेशकर यावेळी बोलताना म्हणाले की, आज मी जे बोलणार आहे ते माझ्याशिवाय कोणीही बोलू शकत नाही. या मंचावर मी सर्वात जास्त गायलो आहे. आशाताई म्हणजेच आशा भोसले घरातली सगळी कामं करत असे. मला कडेवर घेऊन फिरत असे दमल्यावर घरी आली की आजीला विचारायची घरात खायला काय? आजी सांगायची तिखट, तेल आणि भाकरी. आज तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की अनेक वर्षे आमचं हेच अन्न होतं. भाकरी, भाजी, वरण-भात ते आम्हाल माहीत नव्हतं. घरातील सगळी कामं आशाताईला (आशा भोसले) करावी लागत.भांडी घासणं, धुणी धुणं, स्वयंपाक करणं ही सगळी कामं तिला करावी लागत होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कडेवर घेऊनच ती वावरायची, मला हिंडवून आणायची, खेळवायची, माझं संगोपन सगळं आशाताईने केलं आहे. असं काही ऋण असतं ते फेडता येत नाही. मी आशाताईच्या ऋणात आहे, ती नऊ वर्षांची होती तेव्हापासून तिने मला सांभाळलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या