संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर अरुणा ढेरे नाराज, साहित्यिकांवर दबाव नसल्याचं मत
संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर अरुणा ढेरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. साहित्यिकांवर कुठलाही दबाव नाही. देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा असल्याच्या मताशीही असहमत असल्याची अरुणा ढेर यांनी सांगितलं.
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथे सुरु असलेल्या 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली आहे. साहित्यिकांवर दबाव नसल्याचं मत त्यांची व्यक्त केलं आहे. देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा असल्याच्या फादर दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणाशीही असहमत असल्याचं अरुणा ढेरे यांनी म्हटलं आहे.
साहित्य संमेलनाच व्यासपीठ हे साहित्याच्या निरनिराळ्या प्रश्नावर चर्चा करण्याचं व्यासपीठ आहे. मात्र यंदाचे संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे साहित्य आणि साहित्य संमेलना विषयी फारसे बोलले नाहीत. त्यांचे कालचे विचार त्यांनी याआधी अनेक वेळा बोलून दाखवलेली भूमिका आहे, अशी खंत साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली आहे.
संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी यांची हत्या, शेतकरी आत्महत्या याबाबत जे बोलले ती तळमळ खरी आहे. मात्र भाषा विषयीचे प्रश्नही साहित्यिकांना पुरेसे सोडवता आलेले नाहीत. साहित्य क्षेत्रातील विविध अनिष्ट गोष्टींना बाजूला कसं ठेवायचं याचे विचार गंभीरतेने आलेले नाहीत. हे सगळं बाजूला ठेवुन एका मोठ्या प्रश्नाकडे पाहावं, अशी जबाबदारी त्यांना वाटली असावी म्हणुन ते बोलले असावेत असं वाटतंय, असं अरुणा ढेरे म्हणाल्या.
साहित्यिकांवर कुठलाही दबाव नाहीये. आजही अनेक जण आपले विचार लिखाणाच्या माध्यमातून मांडत आहेत. जेएनयूवरुन जे बोललेत त्यावरून मला वाटत नाही की त्यांना काही कृती करायची आहे. कुठलीही हिंसा निंदनियच आहे. देशातील वातावरणावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही, याचा अर्थ माझ्यावर दबाव आहे किंवा मी कुणाला घाबरते, असा होत नाही, असं अरुणा ढेरे यांनी सांगितलं.
जर एखाद्याने वेगळी भूमिका घेतली की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतलाय, असं होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलर शाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्व जण आज सुजाण आहेत, असं काही होणार नाही याचा मला विश्वास आहे, असं ही अरुणा ढेर यांनी बोलून दाखवलं.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो भाषणात काय बोलले?
सध्या देशात जे सुरु आहे, त्यावर आपण भूमिका घ्यायला हवी. मी ती भूमिका घेतोच. मी स्पष्ट बोलतो, आणीबाणीच्या काळातही मी उपरोधिक पत्र लिहीत होतो. प्रत्येक माणसाने नैतिक भूमिका घ्यायला पाहिजे. सध्या देशात सुरु असलेल्या गोष्टींकडे पाहिलं की प्रश्न पडतो की,आपण भुतांच्या प्रदेशात राहतो की माणसांच्या? लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना मारहाण करत असाल, तर आम्ही शांत बसणार नाही. भारतात जर्मनीसारखी परिस्थिती येऊ शकते, असं वक्तव्य करताना दिब्रिटोंनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारची तुलना हिटलरशी केली.
संबंधित बातम्या