दोन वर्षांपासून प्रलंबित पुलाचे अर्धवट बांधकाम ठरतोय मृत्यूचा सापळा; खड्डयात पडून आणखी एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Amravati News : अमरावती जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले पुलाचे बांधकाम मृत्यूचा सापळा ठरतोय. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी विविध घटनेत चार बालकांचा मृत्यू झाला आहे.
Amravati News अमरावती : अमरावती जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यात आईसोबत पाणी आणण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यावर काळाने घाला घातला आहे. या दुर्दैवी मृत्यूस कारण ठरले आहे ते मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले पुलाचे बांधकाम. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी विविध घटनेत चार बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे पुलाचे रखडलेले बांधकाम मृत्यूचा सापळा ठरले आहे. अमरावती जिल्ह्यातील (Amravati News) नांदगाव खंडेश्वर जवळ गाळेगाव जगतपूर रस्त्याच्या पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहे.
या बांधकामाकरिता भला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यातीलच एका खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये बुडून एका सहा वर्षाचा बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ही घटना काल, रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हे प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
खड्डयात पडून सहा वर्षाचा बालकाचा दुर्दैवी मृत्यू
रोनक पवार असं या मृतक बालकाचे नाव असून आई पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर रोनक आईच्या मागे गेला होता. दरम्यान त्याचा पाय घसरून तो या पाण्यात पडला. या खोल खड्ड्यात पानी साचले असल्याने त्यात बुडून रोनकचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून या पुलाचे बांधकाम प्रलंबित आहे. या खड्ड्यांमध्ये आतापर्यंत विविध घटनेत चार बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. मात्र काल रात्री या बालकाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर रोष व्यक्त केलाय. या घटनेनंतर या चिमुकल्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिणामी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला चांगलंच धारेवर धरत दोषींवर कारवाईची मागणी केलीय. तसेच या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
शेतात काम करून परत येत असताना अचानक वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना यवतमाळच्या पुसद तालुक्यात घडली आहे. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जनुना या गावातील रहिवासी संतोष नारायण वाळसे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचे पश्चात वडील, पत्नी, दोन मुलं व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती कळताच नायब तहसिलदार कदम यांनी कुटूंबाला भेट दिली. मात्र, या दुर्दैवी घटनेनंतर मृतकाचा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या