Anil Deshmukh : अनिल देशमुखांना जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहावं लागणार, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण
Money Laundering Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच्यावर ईडीने ठेवलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावर अद्याप निर्णय बाकी आहे.
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा जामीन मंजूर झाला असला तरी त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. कारण सीबीआयकडूनही त्यांच्यावर वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावर निर्णय होणं बाकी आहे.
मनी लॉंड्रिंग आणि 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात ईडीने आणि सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये ईडीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने अनेकदा न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. पण प्रत्येकवेळी तो नाकारण्यात आला. आता तब्बल 11 महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ईडीचा युक्तीवाद
अनिल देशमुखांनी आपल्या गृहमंत्री पदाचा गैरवापर केला. व्यावसायिकांकडून अवैधरित्या वसूलीसाठी त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला. बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा वसुलीसाठी वापर केला. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेतही त्यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप ईडीच्यावतीनं करण्यात आला होता. तर परमबीर सिंह आणि सचिन वाझेनं केलेल्या आरोपांबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही, एखादा मेसेज, व्हॉट्स अॅप संभाषण, व्हिडीओ रेकॉर्डिंगसारखे कोणतेही पुरावे तपास यंत्रणेकडे नाहीत. याशिवाय हत्या आणि स्फोटकांच्या गंभीर खटल्यांमध्ये आरोपी असलेल्या सचिन वाझेच्या जबाबावरून आपल्याला 11 महिन्यांपासून कारागृहात ठेवणं योग्य नाही, असा दावा ईडीच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना देशमुखांकडून करण्यात आला.
सत्यमेव जयते, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. सत्यमेव जयते.. फायनली सत्याचा विजय झाला, मला मनापासून आनंद झाला. बाकीच्यांनाही लवकर जामीन मिळेल अशी आमची आशा आहे. आम्ही लढत राहू असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
प्रकरण नेमकं काय?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. पीएमएलए न्यायालयानं 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं आहे. प्रकृता अस्वस्थाचं कारण तसेच वाढतं वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती देशमुखांकडनं करण्यात आली आहे. अनिल देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांना कोविड 19 ही होऊन गेलाय, या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्यानं त्यांना सतत आधार आणि दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून रहावं लागतंय. त्यामुळे मनवतेच्या भावनेनं जामिनावर सोडण्याची विनंती देशमुखांनी हायकोर्टाकडे केली आहे.