एक्स्प्लोर
फीलिंग पीसफुल.. मृत्यूच्या तासभर आधी 'ती' फेसबुक पोस्ट
जम्मू काश्मिर : पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मिर... आणि त्या स्वर्गाला चार चांद लावणारा गुलमर्ग... गुलमर्गचं हेच सौंदर्य आकाशातून न्याहाळण्याची संधी देणारा रोप वे. याच रोप वेचा आनंद घेण्यासाठी मूळचे नागपूरचे असलेले आंद्रसकर कुटुंबीय गुलमर्गमध्ये दाखल झाले मात्र हा प्रवास अखेरचा ठरेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल.
42 वर्षांचे जयंत आंद्रसकर, 38 वर्षांची त्यांची पत्नी मनिषा, सात वर्षांची जान्हवी आणि चार वर्षांची अनघा. नागपूरच्या जुना सुभेदार ले-आऊटमध्ये राहणारा हा परिवार गेल्या सात वर्षांपासून जयंत यांच्या सरकारी नोकरीमुळे दिल्लीला स्थायिक झाला होता. जयंत हे दिल्लीतल्या पुसा टेक्निकल इन्स्टिटयुटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
दरवर्षी लाखो पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा रोप वे. मुलांच्या सुट्ट्या आणि काश्मीरचं सौंदर्य हा दुहेरी मेळ साधायचा असल्यास परफेक्ट व्हेकेशन. आंद्रसकर कुटुंबातील चौघांनीही केबल कारच्या गंडोलातून प्रवास सुरु केला. काश्मीरचं सौंदर्य डोळ्यात साठवत हे चौघेही जात होते. ढगांचे पुंजके पार करत त्यांची केबल कार पुढे सरकत होती. पण त्याचवेळी एक संकट त्यांच्यासमोर आ वासून उभं होतं.
गुलमर्गच्या खोऱ्यामध्ये वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांनी पाईनचं एक महाकाय झाड आंद्रसर कुटुंबांच्या गंडोला समोर कोसळलं. सातव्या आणि आठव्या खांबामध्ये असलेली केबल तुटली आणि आंद्रसकर कुटुंबीय बसलेला गंडोला तब्बल 400 फुटांवरुन थेट दरीत कोसळला.
त्या केबल कारमध्ये असलेल्या आंद्रसकर कुटुंबातील दोन चिमुकल्या मुलींसह आई वडिलांचाही जागीच मृत्यू झाला. तर त्यातच बसलेले काश्मीरचेच आणखी 3 पर्यटकही दगावले.
दुपारी साडेअकराच्या सुमारास जरी ही घटना घडली असली, तरी संध्याकाळपर्यंत नागपुरात कोणालाच याबाबत माहित नव्हतं. सकाळी अत्यंत आनंदाने मनिषा भाऊ, बहिणी, मेव्हण्याशी बोलल्या होत्या. तर जयंत यांचं आपल्या आई वडिलांशी काश्मिरला पोहचल्यावर बोलणं झालं होतं.
जयंत आंद्रसकर यांनी फेसबुकवर काश्मिरहून अवघा अर्धा तास आधी अपडेट पोस्ट केली होती. त्यामुळे कुटुंबीयांना ही मंडळी काश्मीरमध्ये कसं एन्जॉय करत आहेत, हे समजलं होतं. अर्धा तास आधी जयंत यांनी फेसबुकवर 'फीलिंग पीसफुल' असं लिहिलं, मात्र ही शांतता चिरंतन ठरेल, असं कोणाच्या मनात आलं असेल.
आंद्रसकर कुटुंबीय आपल्या मुलीच्या इच्छेखातर काश्मीरला गेले होते. त्यांच्या अपघाती निधनानं दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानीही शोककळा पसरली आहे. त्यांच्याच बंद घराच्या दाराबाहेर एक चटका लावणारी गोष्ट आढळली. दारात पडलेल्या वर्तमानपत्रात त्यांच्याच निधनाची दुःखद बातमी छापून आली आहे.
खरं तर इतक्या गजबजलेल्या केबल कारच्या सुरक्षेसाठी काटेकोर उपाययोजना करणं आवश्यक होतं. पण
केवळ एक झाड उन्मळून पडल्यानं 7 जणांचा जीव गेला. एक हसतं खेळतं कुटुंब कायमचं निघून गेलं. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करुन, हलगर्जीपणा करणाऱ्यांना कठोर शासन करण्याची गरज आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये रोप वेची केबल तुटली, 7 पर्यटकांचा मृत्यू
जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण असलेला रोप वे. दरवर्षी लाखो पर्यटक भेट देणाऱ्या या रोप वेची वैशिष्ट्य आहेत तरी काय? गुलमर्गमध्ये उभारण्यात आलेला हा रोपवे आशिया खंडातला सर्वात उंच रोप वे आहे. हा रोप वे दोन टप्प्यात असून गुलमर्ग ते कोंगडोरी हा पहिला टप्पा आहे, तर कोंगडोरी ते अफरावत हा दुसरा टप्पा. समुद्रसपाटीपासून तब्बल 13 हजार 780 फूट उंचीवरुन ही केबल कार धावते. प्रतितास 600 पर्यटक वाहून नेण्याची या रोप वेची क्षमता आहे. या रोपवेमध्ये एकूण 36 केबल कार आहेत. या मार्गामध्ये एकूण 18 टॉवर आहेत. जम्मू कश्मीर सरकार आणि फ्रांसच्या एका कंपनीच्या सहकार्याने ही योजना सुरु आहे. पर्यटकांमध्ये इतक्या लोकप्रिय असलेल्या या टूरिस्ट पॉईंटवर असा हलगर्जीपणा झाला का? हलगर्जीपणा झाला असेल, तर तो कुणामुळे झाला? पर्यटकांच्या सुरक्षेमध्ये कुचराई होतेय का? आणि तसं झालं असेल, तर रोप वे सुरक्षित करण्यासाठी आता प्रशासन काय करणार? असे अनेक प्रश्न आता आ वासून उभे आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement