
कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस
IMD Forecast : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे.

मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये उन्हाच्या झळा (Heat Wave) बसत आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा (Unseasonal Rain) देण्यात आला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे शहरात हवामान विभागाने पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
मुंबईसह कोकणात उन्हाच्या झळा
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत उष्मा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांना पुन्हा एकदा कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्याचवेळी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 30, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/Kz4ZCap1mb
राज्यात अनेक जिल्ह्यात पारा 40 पार
गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पलिकडे गेला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद झाली आहे. आज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी रायगड, मुंबई उपनगर आणि ठाण्यासह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 30, 2024
कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/wllbvKk1gX
मुंबईचे हवामान कसे असेल?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात आजपासून पुढील 24 तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील अहमदनगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, रायगड आणि मुंबईच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
