धरण उशाला कोरड घशाला! उजनीच्या पाण्याचं अयोग्य नियोजन, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं सीनाकाठचा शेतकरी संकटात
उजनी धरण हे 110 टीएमसी क्षमतेचं आहे. मात्र, उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन नाही.त्यामुळं शेतकऱ्यांची पिकं संकटात सापडली आहेत. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे.

Agriculture News : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण म्हणजे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील उजणी धरण (Ujani Dam ). हे धरण 110 टीएमसीचे आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाला, त्यामुळं धरणं पूर्ण क्षमतेनं भरलं होतं. यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत होतं. मात्र, सध्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं माढा तालुक्यातील सीना नदीकाठचे शेतकरी पाण्यापासून वंचित राहत असल्याचे स्थिती निर्माण झाली आहे. 110 टीएमसी क्षमतेचं एवढं मोठं धरण असूनसुद्धा प्रशासनाचं योग्य नियोजन नसल्यामुळं शेतकऱ्यांची पिकं संकटात सापडली आहेत. म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे.
उजणी धरण उणे 15 टक्क्यांवर
सध्या उजणी धरण उणे 15 टक्क्यांवर पोहोचलं आहे. धरणात 55.79 टीएमसी पाणी आहे. धरण उणे 25 टक्क्यांवर आले की कालव्यातून पाणी सोडता येत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी पुन्हा पाणी सोडता येत नाही. सध्या सोडलेलं पाणी कमी क्षमतेनं असल्यामुळं अनेक ठिकाणच्या गावांना या पाण्याचा लाभ घेता येत नाही. ज्यावेळी पाण्याची आवश्कता नव्हती, त्यावेळी मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मात्र, आता गरज असताना शेतीसाठी पाणी मिळत नाही. आता धरणाची पाणीपातळी कमी झाल्यामुळं पूर्ण क्षमतेनं पाणी कालव्यामध्ये सोडता येत नाही, त्यामुळं सीना नदीकाठचे शेतकरी चिंतेत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी थेट सोलापूरला जात अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.
सीना-भीमा जोडकालव्यासाठी साडेतीन टीएमसी पाणी, पण...
उजणी धरणाच्या पाण्यावर असलेला सीना-भीमा जोडकालवा हा अत्यंत महत्वाचा आहे. या कालव्याच्या माध्यमातून माढा तालुक्यातील दुष्काळी भागाला सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनe उजनी धरणातून पाणी दिलं जातं. या योजनेअंतर्गत 12 बंधारे येतात. मात्र, या योजनेतून पाणी थेट सोलापूरपर्यंत नेलं जाते. पाणीवाटपात साडेतीन टीएमसी पाणी तीन पाळ्यांमध्ये या योजनेसाठी देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात साडेतीन टीएमसी पाणी मिळते का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सुरुवातीच्या पहिल्या दोन पाण्याच्या पाळ्यांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त दिवस पाणी सोडले जाते. साधारणत 35 ते 36 दिवस सलग पाणी सोडले जाते. तसेच दोन्ही पाळ्यांचे मध्ये कमीत कमी 15 ते 20 दिवसांचे अंतर असणं अपेक्षीत आहे. मात्र, अंतर न ठेवता पाण्यामागून लगेच पाणी सोडले जाते, त्यामुळं भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.
शेतकऱ्यांची पिकं जाणार वाया, पूर्ण मे महिना पाणी मिळणार नाही
सध्या एप्रिल महिना संपत आला आहे. पुढचा पूर्ण मे महिना बाकी आहे. एका बाजूला उन्हाची तिव्रता वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. या दोन्ही संकटात शेतकरी सापडला आहे. पूर्ण मे महिना जर पिकांना पाणी नाही मिळालं तर शेतकऱ्यांची उभी पिकं करपून जाणार आहेत. दरम्यान, सीना भीमा जोडकालव्याचे पाणी ज्या ज्या बंधाऱ्यात येते, यातील काही बंधाऱ्यामध्ये पाणी आहे, तर काही बंधाऱ्यात पाणी नाही. त्यामुळं ज्या बंधाऱ्यात पाणी नाही, ते शेतकरी ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणचे बंधारे खुले करण्याची मागणी करत आहेत. मात्र, तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. बंधारे खुले करणार नसल्याचा इशारा शेतकरी देत आहेत. त्यामुळं दोन्ही गावच्या शेतकऱ्यांमध्ये वितुष्ठ निर्माण होत आहे. प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळं शेतकरी आपापसात भीडताना दिसत आहेत.
आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, शेतकरी आक्रमक
दरम्यान, उजणी धरणाच्या पाण्याच्या ढिसाळ नियोजनाचा जाब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध गावातील शेतकरी प्रशासनाकडे गेले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी देखील उडवा उडवीची उत्तरे दिली. शेतकऱ्यांसमोर कागोदपत्री घोडे नाचवण्याचे काम अधिकारी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. एसीत बसणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना तर ग्राऊंडवरची खरी परिस्थिती काय आहे? याची देखील माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो? खालच्या अधिकाऱ्यांना भेटा? अशा प्रकारची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळं शेतकरी अधिकच आक्रमक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या झळा! उजनी शुन्यावर, जलसाठ्यांची घसरगुंडी, कोणत्या धरणात किती पाणी राहिलंय? वाचा























