Uddhav Thackeray : यांचा अर्धा वेळ दिल्लीत मुजरा करायला जातो, उद्योग बाहेर पाठवायचे आणि फुटक्या एसटीवर जाहिराती छापायच्या; उद्धव ठाकरे यांची जहरी टीका
Uddhav Thackeray Speech : एक काळा टोपीवाला होता त्याने शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अपशब्द वापरले, पण हे शेपट्या घालून बसले अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

रत्नागिरी: मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला, यांना देशभर फिरुन, गुवाहाटीला जाऊन तो सांभाळता येत नाही, यांचा अर्धा वेळ तर दिल्लीत मुजरा करायला जातोय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. राज्यातील सगळे उद्योग गुजरातला पाठवायचे, महाराष्ट्राला कंगाल करायचं आणि फुटक्या एसटीवर जाहिराती छापायाच्या हेच काय यांचे उद्योग असंही ते म्हणाले. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे रत्नागिरीत आल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. खेडच्या गोळीबार मैदानात त्यांची आज सभा होती.
शिवसेना चोरू शकणार नाही...
उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना शक्य ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय?
निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही
हा चुना लगाव आयोग आहे, सत्तेचे गुलाम आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केली. ते म्हणाले की, वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत ते. या निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील पण शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलीय हे लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण होता हा भाजप? कोण होतं त्यांच्या मागे? बाळासाहेब त्यांच्या मागे राहिल्याने ते वाढले. ठेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, त्यांना असंच चिरडायचं असतं. ही ठेकणं चिरडायला एक बोट पुरेसं आहे. ज्यांना आपलं कुटुंब मानलं त्यांनीच आपल्या आईवर हल्ला केला. ज्यांचं राजकीय आयुष्य गेल्या 10-15 वर्षात फुललं, ते आता आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवतात.
राज्याला कंगाल केलं...
उद्धव ठाकरे म्हणाले की, कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले आणि हे गप्प बसले. एक काळा टोपीवाला होता, त्याने शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, त्यावेळी हे शेपट्या घालून बसले. तुमचा अर्धा वेळ फिरण्यामध्ये जातोय, अर्धा वेळ दिल्लीला मुजरा करायला आणि अर्धा वेळ ज्यांना खोकी मिळाली नाहीत, मंत्रीपदं मिळाली नाहीत त्यांना सांभाळायला जातो. सगळे उद्योग गुजरातला जातात, आता कर्नाटकात निवडणूक असल्याने आयफोनचा उद्योग तिकडे गेला. महाराष्ट्राला काहीच द्यायचं नाही, पण तुटलेल्या फुटलेल्या काचांच्या एसटीचे फोटो लावायचे आणि गतीमान महाराष्ट्र अशी जाहिरात करायची हेच यांचे उद्योग.
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचा आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
