Shivsena : लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून भावना गवळी यांना हटवले, राजन विचारे नवे प्रतोद
खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करत भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती.
नवी दिल्ली: उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाची लढाई आता राज्यातून थेट दिल्लीमध्ये पोहोचल्याचं चित्र आहे. आपण भाजपसोबत गेलं पाहिजे अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना शिवसेनेने लोकसभेतील प्रतोदपदावरुन हटवलं आहे. त्यांच्या ठिकाणी आता खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आल्याचं पत्र शिवसेने नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना दिलं आहे.
शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये त्यांनी खासदार राजन विचारे यांची लोकसभेतील प्रतोदपदी निवड केल्याचं सांगितलं आहे. भावना गवळी यांच्याऐवजी आता राजन विचारे हे प्रतोद असतील असं या पत्रात म्हटलं आहे. भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करत शिवसेनेने भाजपसोबत गेलं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यामुळे राज्यातील ही लढाई आता लोकसभेतही पोहोचल्याचं काहीसं चित्र आहे.
काय म्हणाल्या होत्या भावना गवळी?
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्यानंतर खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, सद्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थीतीमुळे आपण व्यतिथ झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपल्यासमोर खूप मोठे आव्हान असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही याची खंत आहे. आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा.
दरम्यान, आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या खासदारांमध्येही चलबिचल सुरू झाल्याची चर्चा असून पक्षाचे 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. मंगळवारी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे.