राष्ट्रपतींचा आज रत्नागिरी दौरा; आंबडवे गावाला भेट देणार, कोकणातील या मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे या गावाला भेट देणार आहेत. ते आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
President Ram Nath Kovind : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मंडणगड तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे या गावाला भेट देणार आहेत. राष्ट्रपती यांचा दौरा हा ऐतिासिक आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता आजची राष्ट्रपतींची आंबडवे गावाला भेट ही अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. मंडणगड शहराशिवाय आंबडवे गावच्या परिसराला छावणीचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्भूमीवर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपतीच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
वाहतुकीत करण्यात आलेले बदल
म्हाप्रल चेकपोस्टकडून शेनाळेमार्गे मंडणगडकडे येणारी वाहतूक शेणाले फाट्यापासून बंद राहील. खेड दापोली शहरामध्ये दापोली फाटामार्गे प्रवेश करणारी वाहतूक कुंबळे फाट्यापर्यंत बंद राहील. बाणकोटकडून पाचरळ फाटामार्गे मंडणगड शहराकडे येणारी वाहतूक पाचरळ फाट्यापर्यंत पूर्ण बंद असेल. बाणकोट कडून पाचरळ फाटा - म्हापरळ - शेनाले फाट्यामार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. म्हाप्रळ पेवे पंदेरीमार्गे बाणकोटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या बंदोबस्तासाठी 118 अधिकारी, 800 पोलीस अंमलदार, 200 होमगार्ड, 1 हजार 118 पोलीस, जलद कृतीदल, दंगा काबू पथक, एस आर पी एफ तुकड्या आणि बॉम्ब शोधक पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद यांच्या आंबडवे दौऱ्यानिमित्त मंडणगडात छावणीचे रूप आले आहे. आंबडवेत जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. 12 फेब्रुवारी हा दिवस मंडणगड तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. कारण या दिवशी देशाचे राष्ट्रपती मंडणगड तालुक्यात येणार आहेत. या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पूर्वतयारी सुरू आहे. दौऱ्याच्या अनुषंगाने तालुकावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका हा सातत्याने विकासापासून वंचित व दुर्लक्षित राहिलेला आहे. कोणत्याही नेतृत्वाने मंडणगड तालुक्याच्या विकासाकडे, मूलभूत सुविधांकडे लक्ष दिलेले नाही. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे हे मंडणगड तालुक्यात आहे. हे तालुक्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मात्र, हे गाव व तालुका आजही विकासापासून दुर्लक्षित राहिला आहे. 2014-15 ला भाजपचे राज्यसभेचे तत्कालीन खासदार अमर साबळे यांनी संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून हे गाव दत्तक घेतले होते. गावासह ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावांचा 355 कोटींचा विकास आराखडा तयार केला मात्र आराखडा आजही कागदावरच आहे. कोट्यावधीची ही उड्डाणे प्रत्यक्षात न देता केवळ हवेतच विरली आहेत. याबाबत तालुकावासियांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे येथे आलिशान सभामंडप उभारण्यात आला आहे. या आलिशान सभागृह मंडपात केवळ मोजक्या लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांना अधिकृत प्रवेश दिला जाणार आहे त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. आंबडवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला रंगरंगोटी केली गेली आहे. स्मारकाच्या आतील बाजूला नवीन विजेच्या जोडण्या करण्यात आल्या आहेत. तर शिरगाव ते आंबडवे दरम्यान 22 किमीच्या रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता केली जात आहे. रस्त्याच्या बाजू पट्ट्या मातीचे भराव टाकून रेलिंग केली जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूची अडचण काढली जात आहे. या दरम्यान सार्वजनिक वाहतुकीसाठी रस्ता पूर्णतःबंद राहणार आहे. मंडणगड नगर पंचायतीचे कर्मचारी शहरातील संपूर्ण रस्ते स्वच्छ करीत आहेत.
आंबडवे येथील महाविद्यालयाच्या इमारतीला, वर्ग खोल्यांना पहिल्यांदा रंगरंगोटी केली जात आहे. आंबडवे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असले तरी आतापर्यंत राजकीय नेत्यांच्या घोषणा वगळता या गावच्या विकासाच्या वाट्याला कायम उपेक्षाच आली आहे. अद्यापही हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आणि दुर्लक्षित राहिलेले आहे. या गावात कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे, मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी नाही. तरीही या शासनाच्या इमारतींना रंगरंगोटी केली जात आहे. तर लोणंद राजेवाडी ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्ग निधी मंजूर होऊन त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे.
महत्त्वाच्या बतम्या: