
Raksha Khadse : 'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
NDA Cabinet Ministers List : केंद्रीय मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना संधी मिळणार आहे. रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.

PM Modi Oath Taking Ceremony : नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) तिसऱ्या शपथविधीपूर्वी राज्यातील बड्या नेत्यांना दिल्लीतून फोनाफोनी सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची लॉटरी लागली आहे. रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी बोलताना रक्षा खडसे भावूक झाल्याचे दिसून आले. माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रक्षा खडसे म्हणाल्या की, माझी राजकारणाची सुरुवातच एकनाथ खडसे यांच्यापासून झाली आहे. माझ्या राजकीय प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. माझ्या माहेरच्या लोकांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. सामाजिक कामाची आवड मला माझ्या वडिलांपासून मिळालेली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर रक्षा खडसे भावूक
एका राजकीय घराण्यात मी सून म्हणून आले. नाथाभाऊ यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. माझ्या आयुष्यातील बरीच परिस्थिती बदलत गेली. त्या परिस्थितीत नाथाभाऊंनी मला खूप साथ दिली आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांसह सर्व जनतेने मला साथ दिली आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. इतकी मोठी संधी मला मिळत आहे, असे म्हणताना रक्षा खडसे भावूक झाल्याचे दिसून आले. मला कुठलीही अपेक्षा नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले सासरे एकनाथ खडसे?
रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याच्यासाठी दिल्लीला बोलवले हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. रक्षा खडसे यांनी अनेक वर्ष केलेल्या श्रमाचे हे फळ आहे. त्याचबरोबर जनतेचे त्यांच्या पाठीशी असलेले आशीर्वाद यामुळे हे शक्य झाले आहे. देशाच्या बरोबर आपल्या भागासाठी रक्षाताई नक्की योगदान देतील, असा आपल्याला विश्वास आहे, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले आहे. ते आता दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
महाराष्ट्रातून पाच जणांना मंत्रिपदासाठी कॉल
महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार यांच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याचीही चर्चा रंगली असताना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.
आणखी वाचा
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
