लोकसभेत दिलेला चारशे पारचा नारा भाजपच्या पिछेहाटीचं कारण ठरलं? शिवसेनेचे केंद्रीय मंत्री स्पष्टच बोलले, म्हणाले...
Maharashtra Politics : लोकसभेत दिलेला 400 पारचा नाराच भाजपच्या पिछेहाटीचं कारण ठरलं. असे वक्तव्य केंद्रीय आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी केलंय.
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेत (Lok Sabha Election 2024) दिलेला 400 पारचा नाराच भाजपच्या (BJP) पिछेहाटीचं कारण ठरला का? असा प्रश्न निकालानंतर सातत्याने विचारला जातोय. अशातच आता भाजपच्या मित्र पक्षाचे नेतेही दबक्या आवाजात याच नाऱ्यामुळे पराभवाचं तोंड पहावं लागल्याचं बोलत आहेत. दुसरीकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार मंत्री आणि शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनीही असंच वक्तव्य केलंय.
400 पारच्या नाऱ्यामुळेच अनेक ठिकाणी कार्यकर्ते गाफील राहिल्याचं ते म्हणालेय. अकोल्यासह (Akola News) राज्यात आणि देशात यामुळेच महायुतीची पिछेहाट झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळालेल्या जाधव आणि अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांचा अकोल्यातील मराठा मंडळ मंगल कार्यालयात महायुतीनं जाहीर नागरी सत्कार केलाय. त्या कार्यक्रमात प्रतापराव जाधव बोलत होते.
पाकव्याप्त काश्मीर अन् चीनला धडा शिकविण्यासाठी 400 पारचा नारा
देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने (Congress) घरवापसी करत दहा पैकी 7 मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी, असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने (Mahavikas aghadi) चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मविआ, महायुतीसह इतर पक्षही जोमाने तयारीला लागले आहे.
... म्हणून आम्हाला काही अंशी पराभवाला समोर जावं लागले
दरम्यान, 400 पारचा नारा हा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आणि चिनला धडा शिकविण्यासाठी असल्याचा दावा केंद्रीय आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी केलाय. लोकसभेच्या निवडणुकादरम्यान विरोधकांनी मोठ्या प्रमाणात खोटे नॅरेटीव्ह पसरवत समाजाची दिशाभूल केली. विरोधकांचा हा डाव हाणून पाडण्यास आणि त्यांना उघडे पाडण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो. परिणामी आम्हाला काही अंशी पराभवाला समोर जावे लागल्याचेही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. असे असले तरी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत.
निवडणुकांच्या काळात त्यांनी दिलेले चारशे पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठी नाही, तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आणि चीनला धडा शिकविण्यासाठी होता.असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. दुसरीकडे 400 पारच्या नाऱ्यामूळे कार्यकर्ते निर्धास्त झाले होते. एखादा कमी असला तर काय होते असं त्यांना वाटत होते. त्यामुळे आम्हाला काही अंशी पिछेहाट झाल्याचे बघायला मिळाल्याचे ही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या