(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्ररणी विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले रडारवर, प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेला अटक
31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या गट ड साठी पेपर झाला होता. परंतु, हा पेपर परीक्षेआधीच फुटल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
मुंबई : आरोग्य विभागातील (health department) पेपर फुटीच्या प्रकरणात आता आरोग्य विभागातील उचपदस्थ अधिकाऱ्यांची नावे उघड होत आहेत. दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढत जाताना दिसत आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी 11 जणांना अटक केल्यानंतर आता विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले पोलिसांच्या रडारवर आहेत. तर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने लातूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांना अटक केली आहे.
31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या गट ड साठी पेपर झाला होता. परंतु, हा पेपर परीक्षेआधीच फुटल्याने गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत सायबर पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या तपासात हा पेपर सेट करण्यात डॉ. महेश बोटले सहभागी होते, तेथूनच आरोग्य भरती प्रकरणाचा पेपर फुटल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात दिसून आलं आहे. आरोग्य विभागातील भरती प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून आता डॉ. महेश बोटले यांचा सायबर पोलीस शोध घेत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. पेपर फुटीमध्ये सहभाग घेणाऱ्या अनेकांची चौकशी सुरू झाली. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील विजय प्रल्हाद मुऱ्हाडे आणि अनिल दगडू गायकवाड या दोघांना सर्वप्रथम अटक करण्यात आली त्यांच्याकडे तपास केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील बबन बालाजी मुंडे या व्यक्तीने पेपरफुटीत सहकार्य केल्याचं समोर आलं. खासगी कोचिंग क्लास चालक सुरेश रमेश जगताप या जालना येथील व्यक्तीलाही अटक करण्यात आली. त्यानंतर ही साखळी वाढतच गेली. औरंगाबाद येथून संदीप शामराव भुतेकर, पुण्यातून प्रकाश दिगंबर मिसाळ यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अधिक माहिती घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे या व्यक्तीला अटक करण्यात आली. यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणातील मोठं नाव समोर आला आहे.
बडगिरेच्या अटकेनंतर महत्वाची माहिती समोर
लातूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडगिरे यांचा यात सहभाग असल्याचे समोर आले. बीड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड यांनाही अटक करण्यात आली आहे. शिवाय बीड मधील श्याम मस्के आणि राजेंद्र सानप या दोन व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी काल या प्रकरणात प्रशांत बडगिरे यांना अटक केली आहे. बडगिरेकडे केलेल्या चौकशीतून आरोग्य विभागाच्या या परिक्षेची प्रश्नपत्रिका तयार होत असतानाच ती फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. ही प्रश्नपत्रिका सहसंचालक डॉ. महेश बोटले यांनी पेपर सेट करतानाच फोडली असा त्यांच्यावर आरोप आहे. महेश बोटले यांनी तो पेपर प्रशांत बडगिरे यांना दिला. त्यानंतर प्रशांत बडगीरे याने तो विकण्यास सुरुवात केली. बडगीरे याने त्याच्या विभागातील डॉ. संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर विकला असा पोलिसांनी आरोप केला आहे.
हा पेपर फुटल्यानंतर राज्यभरातील अॅकॅडमी चालवणाऱ्यांकडे पोहचला. त्यानंतर अॅकॅडमी चालवणाऱ्यांकडून तो विद्यार्थ्यांना विकण्यास सुरुवात झाली. पुणे सायबर पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चोैकशी करून या प्रकरणात सहभागी असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांसह इतर संशयीतांनाही तातडीने अटक केली.
आतापर्यंत या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली असून आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागाचा हा पेपर फुटल्यानंतर तो राज्यातील अनेक ठिकाणी विकण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्याच्या इतरही भागातून आणखी काही जणांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ए. बी. पी. माझाने पेपर फुटीचा हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुणे पोलीसांच्या तपासाला वेग आला आहे.
दरम्यान, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले हे 25 तारखेपासून रजेवर आहेत.
संबंधित बातम्या
नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! आरोग्यभरती घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासाला वेग, दोन जणांना अटक
Health Exam Paper Leak : कुंपणानंच शेत खाल्लं! आरोग्य विभागाचा पेपर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच फोडला