Nanded : लग्नपत्रिका वाटताना करार पत्रावर शेतकऱ्यांच्या घेतल्या सह्या, नांदेड साखर कारखाना अध्यक्षांचे धक्कादायक कृत्य
Nanded : कर्मचाऱ्यांकडून 'व्याज नको'च्या करारपत्रावर सभासदांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांच्या नातीच्या विवाह सोहळ्याची पत्रिका वाटप करताना कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून 'व्याज नको'च्या करारपत्रावर सभासदांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र गणपूर गावातील अनेक सभासदांनी सक्तीच्या करारपत्रावर स्वाक्षरी न करण्याचा निर्धार करून भाऊराव चव्हाण कारखान्याच्या या प्रकारास विरोध केला आहे.
सन 2014-15 च्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने एफआरपी एकरकमी अदा केली नव्हती. या प्रकरणी नांदेड विभागातील बहुतांश साखर कारखान्यांविरूद्ध याचिका दाखल झाली आहे. ही याचिका निकाली काढताना औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या साखर आयुक्तांवर निर्णय सोपविला होता. त्यांनी याचिकाकर्ते प्रल्हाद इंगोले तसेच संबंधित कारखानदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर 2019 साली व्याजासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता.
ज्यात 2014-15 चे विलंब एफआरपी व्याज भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने देण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार भाऊराव साखर कारखान्याची गाळप क्षमता ही 5 लाख टन आहे. ज्यात 200 गावापैकी प्रत्येक गावातून किमान 20 सदस्य संख्येनुसार एक हजार ते पाचशे टन ऊस सदर कारखान्यास पुरवठा केला जातो. त्यासाठी नांदेड विभागातील 20 कारखान्यांनी तब्बल 20 कोटी थकीत एफआरपी व्याज शेतकऱ्यांना कारखान्यांनी देने आहे. ज्यात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील 200 गावा मधील जवळपास 10 हजार शेतकऱ्यांचे 5 कोटी थकीत व्याज भाऊराव कारखान्याने देने आहे. सदर व्याज देऊ नये यासाठी भाऊराव कारखान्याने शक्कल लढवत सहमती पत्रावर सह्या घेऊन व्याजाची रक्कम बुडवण्याचा डाव आखला होता.
त्याविरोधात कारखानदारांनी राज्य सरकारकडे दाद मागितली तरी सरकारने साखर आयुक्तांचा निर्णय फिरवलेला नाही. मधल्या काळात लेखा परीक्षकांनी विविध कारखान्यांकडे निघणारे व्याज निश्चित केले होते. त्यानुसार भाऊराव चव्हाणला व्याजाबद्दल चार कोटींचे देणे असून आता कारखाना प्रशासनाने सभासदांकडून करारपत्र घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यात आम्हाला व्याज नको,असे त्यांच्या इच्छे विरुद्ध ,बळजबरीने लिहून घेतले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर सदर करार पत्रावर सही न केल्यास शेतकऱ्यांचा ऊस न नेण्याची धमकी कारखान्याने दिली आहे. भाऊराव कारखान्याच्या चालकांनी दोन वर्षांत दोन कारखाने विकून 140 कोटी रूपये उभे केले. त्यामुळे हा कारखाना कर्जमुक्त झाला. पण शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ देण्याच्या बाबतीत कारखाना कुचराई करून आलेला एफआरपी चा पैसा लाटण्याचा तयारीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
संबंधित बातम्या
दक्षिण भारतातील सर्वात मोठी माळेगाव यात्रा रद्द; कमी लसीकरण आणि ओमायक्रोनच्या धोक्यामुळे प्रशासनाचा निर्णय
अॅड. सदावर्तेंच्या कौटुंबिक कार्यक्रमाला एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे स्वरूप
चोर समजून पायी जाणाऱ्या मजुराला जमावाची मारहाण, नांदेडमधील घटना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha