(Source: ECI/ABP News/ABP Majha)
N D Patil : रचनात्मक लढाईचा निर्माता, सीमा लढ्याचा नेता, सेझ लढ्याचा कॅप्टन, एन. डी पाटलांची धगधगती कारकीर्द
शेतकऱ्याचं आंदोलन, सीमा भागाचा लढा, कोल्हापूर शहरातील टोल नाक्याचा लढा असो की कष्टकऱ्यांचे प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवर प्रा. एन. डी पाटील (N D Patil) यांनी शेवटपर्यंत लढा दिला.
N D Patil : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील ( N D Patil ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केले. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी ( नागाव ) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले.
प्रा. एन. डी. पाटील यांनी 1954 ते 1957 या कालावधीत सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहिले. याबरोबरच त्यांनी या काळात ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणूनही काम पाहिले. 1960 साली सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये प्राचार्यपदी रूजू झाले. एन. डी. पाटील यांच्यावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा खूप प्रभाव होता. कर्मवीरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून 1962 मध्ये एन. डी. पाटील यांनी काम पाहिले. त्यानंतर 1965 ला शिवाजी विद्यापीठात सिनेट सदस्य,1962 ते 1978 या कालावधीत शिवाजी विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठात 1976 ते 1978 मध्ये सामाजशास्त्र विभागाचे डीन म्हणून काम केले. याबरोबरच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य म्हणून 1991 ला काम पाहिले. तर 1959 पासून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य एन. डी. पाटील कार्यरत होते. याबरोबरच 1990 पासून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन पदही त्यांनी भूषवले. तर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बेळगावच्या अध्यक्ष पदाची धुरा 1985 पासून एन. डी. पाटील यांनी सांभाळली. एन. डी. पाटील यांनी शैक्षणिक कार्यासह राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमठवला.
1948 ला एन. डी. पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 1957 ला मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. तर 1960ते 1966, 1970 ते 1976 आणि 1976 ते 1982 अशी 18 वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 1969 ते 1978 आणि 1985 ते 2010 या कालावधीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. एन. डी. पाटील यांनी 1978 ते 1980 या काळात महाराष्ट्राचे सहकारमंत्री पद भुषवले. त्यानंतर 1985 ते1990 मध्ये कोल्हापूर मतदारसंघात विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. 1999 ते 2002 या काळात लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक म्हणून काम केले. याबरोबरच एन. डी. पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य म्हणून काम केले. बेळगाव-महाराष्ट्र सीमा चळवळीचे ते प्रमुख नेते होते.
आपले संपूर्ण आयु्ष्य समाजकारणासाठी वाहून घेतलेल्या एन. डी. पाटील यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये 1994 ला भाई माधवराव बागल पुरस्कार, 1999 ला स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ नांदेडने डी. लीट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही 2000 साली एन. डी. पाटील यांना डी. लीट. पदवी दिली. शिवाजी विद्यापीठाचीही एन. डी. पाटील यांना डी. लीट पदवी मिळाली आहेत. तर शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
आपल्या कारकीर्दीत एन. डी. पाटील यांनी अनेक मोठ-मोठी पदे भूषवली होती. यात 2001 ला परभणी येथील विचारवेध संमेलनाचे अध्यक्षपद, 1998 ते 2000 या काळात भारत सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे अध्यक्षपद, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीचे उपाध्यक्ष, अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे अध्यक्ष, सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे अध्यक्ष, जागतिकीकरण विरोधी कृतिसमितीचे मुख्य निमंत्रक, इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य म्हणून एन. डी. पाटील यांनी काम पाहिले.
डॉ. एन. डी. पाटील यांनी अनेक विषयावर सखोल लेखन केले. यामध्ये समाजविकास योजनेचे वस्त्रहरण, शेत जमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा, कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट, शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयकरण, वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट, महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप, शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत, शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यासह अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य
डॉ. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून काम करत असातना औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, साखरशाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक–पालक योजना, दुर्बल शाखा विकास निधी, म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना केली. याबरोबरच कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना दिली.
महत्वाच्या बातम्या