Mla Nitin Deshmukh : माझे पती हरवले! शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीची पोलिसात तक्रार
शिवसेनेचे बाळापुरचे नॉट रिचेबल आमदार नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली आहे. शहरातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात त्यांनी मिसिंगची ही तक्रार दाखल केली आहे.
Mla Nitin Deshmukh : अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापुरचे नॉट रिचेबल आमदार नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली आहे. शहरातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात त्यांनी मिसिंगची ही तक्रार दाखल केली आहे. रात्रीपासूनच ते संपर्कात नसल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. सोबतच्या लोकांनाही ते कुठे आहेत हे माहित नसल्याची माहिती आहे. आपल्या पतीला लवकर शोधा, अशी विनंती आमदार देशमुख यांच्या पत्नी प्रांजली यांनी पोलिसांकडे केली आहे.
पती नितिन देशमुख यांच्याशी शेवटचं बोलणं हे काल सायंकाळी सहा वाजता झालं होतं. त्यावेळी त्यांनी अकोल्याला येणार असल्याचे सांगितले होते. पुढे त्यानंतर सात वाजल्यापासून त्यांचा फोन लागत नसल्याची माहिती आमदार नितिन देशमुख यांच्या पत्नीनं दिली. त्यामुळं मी मिसिंगची तक्रार दाखल केली असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितिन देशमुख हे सूरतमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तिथे त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना गंभीर अवस्थेत नवीन सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष कक्ष क्रमांक 15 मध्ये उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे 25 शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.
नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.