मोठी बातमी! पुण्यातील कुख्यात गुंड श्रीकांत शिंदेंच्या भेटीला, भेटीचा फोटोही आला समोर
Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे आणि गुंड हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पुणे : पार्थ पवार (Parth Pawar) यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे (Gajanan Marne) यांच्या घेतलेली भेटीवरून टीका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकर (Hemant Dabhekar) यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची भेट घेतली असल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हेमंत दाभेकर हा गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून, शरद मोहोळ यांचा अत्यंत जवळचा होता. अशात दाभेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आल्याने आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत : संजय राऊत
याबाबत संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “मा. गृहमंत्री देवेन्द्रजी जय महाराष्ट्र!... महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात, गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण?... काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!,” असे राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मा. गृहमंत्री देवेन्द्रजी
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2024
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात!
गुंडांचे इतके बळ का वाढले?
या परिस्थितीस जबाबदार कोण?
काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील… pic.twitter.com/jnmgurI5gm
पार्थ पवार आणि गुंड गजा मारणेची भेट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि गजा मारणेच्या घरी सदिच्छा भेट झाली होती आणि त्याचे फोटो समोर आले होते. पार्थ पवारांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि त्याचवेळी त्यांनी मारेणेंच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी गजानन मारणे आणि पत्नी जयश्री मारणेंनी पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचं स्वागतही केलं. मात्र, या भेटीवरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. विशेष म्हणजे, पार्थ पवार आणि गुंड गजा मारणेची भेट चुकीचं असल्याचे अजित पवार म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: