Raj Thackeray Speech Highlights: कोकणाची दुर्दशा...बारसूतील कातळशिल्प; राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मु्द्दे
Raj Thackeray Speech in Khed Highlights: राज ठाकरे यांनी खेड येथील सभेत राज्याचे राजकारणापासून ते रिफायनरीच्या प्रकल्पावर भाष्य केले.
Raj Thackeray Speech Highlights: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड येथील सभेत राज्याचे राजकारणापासून ते रिफायनरीच्या प्रकल्पावर भाष्य केले. शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. कोकणात पर्यटनस्थळ विकसित करून राज्याचे अर्थकारण चालवता येईल. मात्र, व्यापारी प्रवृत्तीच्या राजकारण्यांना याची किंमत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.
>> राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार.
कोकणाची दुर्दशा झाली आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. कोकणातले राजकारणी म्हणजे व्यापारी आहेत, अशांना तुम्ही परत परत निवडून देणार असाल तर काय वेगळं होणार. मुंबई-गोवा महामार्गाच काम २००७ ला सुरु झालं पण तरीही अजून काम पूर्ण नाही झालेलं कारण निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे की काम नाही केलं तरी निवडून देणार आहेतच मग कशाला कामं करायची.
समृद्धी महामार्ग 4 वर्षात झाला मग 15 वर्षांत मुंबई गोवा महामार्ग का नाही झाला?
आपल्या पायाखालून जमीन निघून जात आहे तरी कोकणातील माणसाला कळत कसं नाही की शेकडो एकरांचे व्यवहार होत आहेत ते. लोकप्रतिनिधींना माहीत असतं कुठे प्रकल्प येणार ते, मग तेच जमिनीचे व्यवहार करून हजारपट नफा कमवतात. लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्याकडून कवडीमोलाने जमीन घेतात आणि सरकारकडून भरमसाट पैसे घेतात. आणि ह्यावर कोणीही बोलत नाही.
कोकण ही प्रतिभावंतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या भारतरत्नांपैकी 6 भारतरत्न ही कोकणातून आहे. इतक्या प्रतिभावान कोकणी माणसाला काय झालं आहे?
दाभोळला एनरॉनच्या वेळेस असो, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या आणि अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या. तो गब्बर श्रीमंत झाला. आणि माझा कोकणी माणूस तसाच राहिला. ह्याचं मला खूप वाईट वाटतं,राग येतो.
२०१४ च्या आधी तेंव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार अशी घोषणा केली. मी त्यावर काय बोललो हे लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा ह्या पुतळ्याला विरोध आहे. मी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं वाटतं तुम्हाला? बरं हे बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार हे महाराजांचं नाव घेत नाही आणि हे मला बदनाम करणार.
माझा मुद्दा इतकाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर 10 हजार कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचं खरं स्मारक आहे, त्यांचं आधी संवर्धन करा हे माझं म्हणणं होतं. पण माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला.
कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, इतकं वैविध्य असलेलं कोकण. इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काहीच घेणंदेणं नाही.
बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही.
कातळशिल्पांच्या आसपास तीन किलोमीटरपर्यंत कुठलाही विकास प्रकल्प करता येणार नाही. बारसूच्या रिफायनरी साईटच्या परिसरांत कातळशिल्प आहेत, म्हणजे इथे रिफायनरी होऊच शकत नाही. त्यामुळे माझी कोकणातील बांधवाना विनंती आहे की तुम्ही ह्यापुढे जमीन विकू नका.
इथल्या जमिनी हड्पणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणं इतकंच इथल्या लोकप्रतिनिधींचं उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच .
शिवसेनेची भूमिका नक्की आहे आहे रिफायनरींबाबत? खासदार म्हणतात होणार नाही, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेंव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे?