Weather Update: सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
राज्यभरात पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update: कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून ऐन दिवाळीत राज्यभरात पावसाने हजेरी लावली. (Rain Today) कोल्हापूर, सांगली ,हिंगोली, रत्नागिरी या सर्वच भागात पाऊस कोसळल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागांमध्ये दाणादाण उडाली होती. त्यानंतर परतीचा पाऊस व आता अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. राज्यभरात पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज बहुतांश महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट आहेत. (IMD Forecast)
Weather Update: हवामान विभागाचा अंदाज काय?
मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार असून महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह महाराष्ट्रात काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान तज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी दिला आहे. दुसऱ्या बाजूला आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता पुढील दोन दिवसांमध्ये वाढवून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. 27 ऑक्टोबरला हे चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते वायव्य दिशेला सरकून आंध्र प्रदेश ओडीसा किनारपट्टी जवळ येण्याचा अंदाज आहे. या दोन्ही तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात कोकणापासून ते विदर्भापर्यंत बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला या दोन्ही कमी दाबांच्या क्षेत्राची तीव्रता कमी होईल. त्यानंतर राज्यात हवामान कोरडं होण्यास सुरुवात होईल.
Thunderstorm accompanied with lightning, heavy rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and South Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 24, 2025
पुढील 4 दिवस कुठे इशारे ?
25 ऑक्टोबर : आज राज्यभरात पावसाचे येलो अलर्ट असून नांदेड हिंगोली कोल्हापूर वगळता संपूर्ण राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे .
26 ऑक्टोबर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर ,नांदेड व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट .
27 ऑक्टोबर : रायगड ,पुणे, नगर, बीड,बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर व गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट .उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
28 ऑक्टोबर : सिंधुदुर्ग, कोल्हापूर,नांदेड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट . दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता .
तळकोकणात पावसाची रिपरिप
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. तर दुसरीकडे समुद्रात वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह गुजरात मधील मच्छीमारी बोटी देवगड बदरात आश्रयाला आल्या आहेत. २८ ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज आणि उद्या जिह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात रिमझिम पाऊस कोसळत असल्यामुळे भात कापणी ठप्प झाली असून भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण काही ठिकाणी कापलेल भात भिजून वाया जात आहे, हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेत आहे.
























