(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra ST Strike : ना मंत्री, ना मुख्यमंत्री, राज ठाकरे थेट शरद पवारांच्या भेटीला
Maharashtra ST Worker Strike : राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) शिष्टमंडळ देखील सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला जाणार आहे
मुंबई ( Mumbai) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर जाणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ही भेट होणार असून एसटी कर्मचाऱ्यांकडून विलिनीकरण हा प्रमुख मुद्दा आहे. आज (11 नोव्हेंबर) संध्याकाळी साडेपाच वाजता शरद पवारांची भेट घेणार आहे.
राज ठाकरेंसोबत शिष्टमंडळ देखील सिल्व्हर ओकवर जाणार आहे. या शिष्टमंडळात मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, एसटी कर्मचारी संघटनेचं शिष्टमंडळ आणि मनसे परिवहन संघटनेचे पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला जाणार आहे. एसटीच्या राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेले एसटी कर्मचारी सहाव्या दिवशीही ठाम आहेत. त्यामुळे राज्यभर लाल परीला ब्रेक लागला आहे. आता बुलढाणा, नाशिक या ठिकाणी तर एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबही धरणं आंदोलनाला बसली आहेत. तीव्र आंदोलन, आणि बैठकांचं सत्र होऊनही तोडगा निघत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटून मागण्यासंदर्भात चर्चा केली.
तिकडे एसटी आंदोलनावरून भाजपचा ठिय्याही कायम आहे. सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृ्त्वात एसटीचं शिष्टमंडळ परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेणार आहे. मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या आणि राज्यसरकार विलीनीकरण न करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्यानं एसटी प्रश्नाबाबत तोडगा कधी निघणार हाच प्रश्न आहे.
मनसेनं यापूर्वीच एसटी कामगारांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईसोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागू शकतो. आंदोलनाच्या दिवसापासून आतापर्यंत एसटी महामंडळाचे 100 कोटींचे नुकसान झाले आहे.
मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही : राज ठाकरे
मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा राज ठाकरे यांच्यासमोर ठेवल्या. आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय, महाराष्ट्राला जोडतोय. पण दरवेळी आमच्या पगाराच्या वेळेस पैसे कसे नसतात. आता या 12 दिवसांच्या संपानंतर विलिनीकरण समिती स्थापन झाली, कोर्टाची पुढची तारीख आली आणि हाती काही लागलं नाही तर बायकोला काय सांगायचं? असा सवाल त्यांनी केला.
संबंधित बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha