SSC Exam 2024 : कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा! बारावीनंतर आता दहावीच्या पेपरलाही कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, भरारी पथक फक्त नावालाच
Yavatmal : यवतमाळच्या चिखली येथील वसंतराव नाईक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर अक्षरशः कॉप्यांचा पाऊस पडला आहे. कॉपी बहाद्दरांच्या या प्रकारामुळे सर्व यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
SSC Exam 2024 Yavatmal : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या (10th Board Exam) परीक्षा 1 मार्चपासून सुरू झाल्या आहे. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या या करिता प्रशासनाकडून बैठे आणि फिरते पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र कॉपीमुक्त अभियानाच्या सर्व उपाययोजनांचा यवतमाळच्या (Yavatmal) दारव्हा तालुक्यातील चिखली येथील वसंतराव नाईक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे.
चिखली येथील वसंतराव नाईक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर (SSC Exam) विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षकांच्या समोरच कॉपी पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवार झालेल्या इयत्ता दहावीचा दुसरा इंग्रजीच्या पेपरला चिखली येथील वसंतराव नाईक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर अक्षरशः कॉप्यांचा पाऊस पडला आहे. या कॉपी बहाद्दरांच्या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा, परीक्षा केंद्र संचालक, भरारी पथक या सर्व यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पर्यवेक्षकांसमोर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट
चिखली येथील वसंतराव नाईक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पहिल्याच पेपर पासून सर्रास कॉपी सुरू असल्याचे चित्र आहे. विद्यालयाच्या मागच्या बाजूने असलेल्या दहा ते बारा फुटाच्या भिंतीवर चढून तरुणांकडून कॉफी पुरविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे समोर आले आहे. तर विद्यालयाच्या मागील खिडक्यांमधून कॉप्या पुरवण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड लागली आहे. गावातीलच एका घरामधून झेरॉक्स मशीन मधून झेरॉक्स काढून या कॉप्यांची विक्री केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली असता परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षकांसमोरच विद्यार्थी कॉपी करत असल्याचे धक्कादायक चित्र देखील समोर आले आहे. सध्या या सर्वप्रकारचे काही फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. मात्र या सर्व गंभीर प्रकरणाकडे पोलीस आणि शिक्षण विभागातील यंत्रणेने मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याने सऱ्याकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा सर्व प्रकार परीक्षा केंद्रात सुरू असताना शाळेतील पथक आणि भरारी पथक नेमके काय करत होते, हा प्रश्न देखील या निमित्याने उपस्थित केला जात आहे.
अवघ्या दहा मिनिटातच दहावीचा पेपर सोशल मीडियावर झाला व्हायरल
नुकताच दहावीचा मराठीचा पहिला पेपर अवघ्या दहा मिनिटातच सोशल मीडियाववर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यवतमाळच्या पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर दहावीचा मराठीचा पहिला पेपर फुटला होता. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांनी तक्रार दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून पेपर व्हायरल करणाऱ्या मोबाइलधारकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केले करत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. दहावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, ह्या दृष्टीकोनातून विविध पथके गठीत केली होती. तसेच विविध परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तरी देखील यवतमाळ मधील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर अवघ्या दहा मिनिटांत पेपर सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याची घटना घडली होती. असे असतानाच जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्याने अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित केल्या जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या