(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओमायक्रॉनबाधित रुग्णाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Omicron Variant In Maharashtra : राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 450 इतकी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 327 इतकी झाली आहे.
Omicron Variant In Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 450 वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 198 नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तब्बल 190 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर चार रुग्ण ठाण्यातील आहेत. सातारा, नांदेड, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आज प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. पिंपरी चिंचवडमधील एका ओमायक्रॉनबाधित रुग्णाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सदर व्यक्ती नायजेरियातून 12 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवडमध्ये आली होती.
पिंपरी चिंचवडमध्ये 28 डिसेंबरला मृत्यू पावलेल्या रुग्णाला ओमयक्रोनची लागण झाल्याचं समोर आलंय. पण या रुग्णाचा हृदय विकाराचा धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हृदयाच्या उपचारासाठी ती व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली होती. तेव्हा सौम्य धक्का बसला होता आणि दुसऱ्या हृदय विकाराच्या धक्क्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली. सदर व्यक्ती नायजेरियातून 12 डिसेंबरला आली होती. 17 डिसेंबरला त्यांना हृदयात त्रास जाणवू लागला. म्हणून त्यास परदेशी रुग्णांसाठी राखीव असणाऱ्या भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण हृदय विकाराचा सौम्य धक्का असल्याचं तपासात निष्पन्न झालं. मग पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयातील रुबी एलकेअर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच कोरोनाची लक्षणं ही जाणवू लागली. म्हणून कोरोनाची चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ओमयक्रोन चाचणीसाठी नमुने देण्यात आले. अहवाल प्रतीक्षेत असतानाच संबंधित रुग्णाची तब्येत सुधारली होती. पण 28 डिसेंबरला पुन्हा हृदय विकाराचा धक्का बसला अन् त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. याच रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणखी दोन रुग्ण ओमयक्रॉन बाधित झालेत. आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड शहरात ओमयक्रॉनचे 26 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णापैकी 15 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 450 इतकी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 327 इतकी झाली आहे. म्हणजेच 60 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील 450 रुग्णांपैकी 125 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
राज्यात कुठे किती ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत?
मुंबई - 327 रुग्ण
पिंपरी चिंचवड - 26 रुग्ण
पुणे ग्रामीण - 18 रुग्ण
पुणे शहर - 12 रुग्ण
ठाणे - 12 रुग्ण
नवी मुंबई - 7 रुग्ण
पनवेल - 7 रुग्ण
कल्याण डोंबिवली - 7 रुग्ण
नागपूर - 6 रुग्ण
सातारा - 6 रुग्ण
उस्मानाबाद - 5 रुग्ण
वसई विरार - 3 रुग्ण
नांदेड - 3 रुग्ण
औरंगाबाद - 2 रुग्ण
बुलढाणा - 2 रुग्ण
भिवंडी - 2 रुग्ण
लातूर - 1 रुग्ण
अहमदनगर - 1 रुग्ण
अकोला - 1 रुग्ण
मीरा भाईंदर- 1 रुग्ण
कोल्हापूर - 1 रुग्ण