Maharashtra Rain : राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, अनेकांचा संसार उघड्यावर; शेती पिकांना मोठा फटका
Maharashtra Rain : राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Maharashtra Rain : राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटता सापडले आहेत. राज्यातील बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये शेती पिकांसह घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळं उघड्यावर पडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात रात्री अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा आहे. बुलढाण्यात आजचं तापमान हे 15.2 अंश सेल्सिअस आहे. थंड हवेमुळं मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बुलढाण्यात गेल्या 70 वर्षात एप्रिल महिन्यातील आजचं नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली. जवळपास एक तास पाऊस बरसला. मुसळधार पावसानं चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात पाणी साचले होते. मुख्य मार्गावर पावसाचे पाणी साचल्यानं गाड्यांना वाट काढताना कसरत करावी लागली. अमरावती जिल्ह्यातही जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत.
सांगोला तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पाऊस, घरांवरील पत्रे उडाले
सांगोली तालुक्यातीस वाढेगाव परिसरातील दिघे वस्ती, हजारे वस्ती इंगोले बामणे वस्ती या भागातील वादळी वाऱ्यामुळं अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत. यामुळं घरातील संसार उपयोगी साहीत्य आणि धान्याचं मोठं नुकसान झालं आहे. या वादळात विजेचे पोलही पडल्यानं विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. शेती पिकाचेही लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या वादळात अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सांगोला तालुक्यात शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुसाट वारे सुटले. यामध्ये पाऊस होता. सुसाट वाऱ्याने 20 ते 25 कुटुंबातील घरावरील पत्रे उडून ते 400 ते 500 फुटावर जाऊन पडले. या वादळी वाऱ्यानं कोंबड्याची खुरुडे आणि कोंबड्याही उडून गेल्या. तसेच झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचप्रमाणे घरातील धान्य भिजले आहे. घरातील फॅन, टीव्ही, कपाट याचेही मोठे नुकसान झाले आहे.
काही दुकानाचे पत्रे उडाल्याने दुकानातील सगळं सर्व साहित्य भिजले आहे. हायवे लगत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका या वाऱ्यानं झोपली आहे . या वादळी वाऱ्यात सव्वाशेहून अधिक विद्युत खांबही पडले असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळमध्ये गारपीट
जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटीमुळं केज तालुक्यातील कुंभेफळ परिसरात शेतीचं मोठं नुकसान झालं आबहे. यावेळी गारांचा इतका मोठा सडा पडला की, लोकांनी घरातून अगदी टोपल्यानं गारा भरुन बाहेर नेऊन टाकल्या आहेत. अचानक झालेल्या गारपिटीमुळं भाजीपाल्यासह फळबागांचही मोठे नुकसान झालं आहे. हा घराचा पाऊस इतका मोठा होता की, शेतामध्ये जिकडे बघावं तिकडे पांढरे शुभ्र जमीन पाहायला मिळत होती. आता या नुकसानाची भरपाई करायची कशी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
महत्त्वाच्या बातम्या: