(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: प्रितीसंगमाने प्रथमच अनुभवला 'शरद पवार साहेब प्रेमी' अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; राष्ट्रवादीतील तरुण फळी जमल्याने दुणावला उत्साह!
Sharad Pawar: प्रितीसंगमावर जाणं हे शरद पवारांसाठी नवीन नसले, तरी आजच्या दौऱ्याला विशेष महत्व होते. बंडाळीनंतर प्रितीसंगमावर पवारांची कोण कोण भेट घेणार याचीच चर्चा रंगली होती.
Sharad Pawar: देशासह राज्यातील संसदीय राजकारणातील चालता बोलता इतिहास असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुतण्या अजित पवार यांनी केलेल्या बंडाळीनंतर कराडमध्ये समाजकारणाचे तीर्थक्षेत्र असलेल्य प्रितीसंगमावर पोहोचले. अजित पवार यांनी रविवारी दुपारी शपथविधी सोहळा केल्यानंतर काका शरद पवार पुण्यात होते. त्यामुळे पुण्यापासून ते प्रितीसंगमापर्यंत ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यामध्ये रविवारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील उपस्थित होते. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, तसेच त्यांच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार असणारे जवळचे मित्र सातारचे खासदार श्रीनिवास पाटील तसेच मतभेद असूनही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही संकटात दाखवलेली सोबत बरंच काही सांगून जाणारी होती.
प्रितीसंगमाने अनुभवला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक
प्रितीसंगमावर जाणं हे शरद पवारांसाठी नवीन नसले, तरी आजच्या दौऱ्याला विशेष महत्व होते. बंडाळीनंतर प्रितीसंगमावर पवारांची कोण कोण भेट घेणार याचीच चर्चा रंगली होती. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता होती. त्यामुळे आजची सकाळी प्रितीसंगमावरील गर्दी तीच साक्ष देणारी होती. आजवर कधीच गर्दी अनुभवली नव्हती, तेवढी गर्दी प्रितीसंगमाने आज अनुभवली. जवळपास 25 हजारांवर लोकांनी त्याठिकाणी गर्दी केली होती.
राष्ट्रवादीची तरुण फळीही प्रितीसंगमावर
शरद पवार प्रितीसंगमाच्या दिशेने येत असताना त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार सोबत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षांतर्गत बाबी हाताळण्यासाठी मुंबईत पक्ष कार्यालयात ठाण मांडून असतानाच त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील समर्थकांसह कराडात आले होते. दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील सुद्धा मतदारसंघातील समर्थकांसह प्रितीसंगमावर शरद पवारांच्या स्वागतासाठी हजर होते. अजित पवारांच्या बंडाने पक्षावर काही फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
मतभेद असूनही पृथ्वीराज चव्हाण हजर
विशेष करून काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यामध्ये काही बाबींवरून, तसेच धोरणांवरून मतभेद वारंवार दिसून आले आहेत. मात्र, चव्हाण आज प्रितीसंगमावर शरद पवारांसोबत होते. त्यामुळे पक्षावर संकट आले, तरी काँग्रेस सोबत असल्याचा संदेश त्यांनी कृतीतून दिला. प्रितीसंगमावर अभिवादन करताना शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना बोलवून घेतल्याने तो प्रसंगही लक्षवेधी ठरला.
इतर महत्वाच्या बातम्या