(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार कुठे होते?
शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार कुठे गेले? ते नाराज आहेत का? या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अजित पवारांनी मुंबईतून थेट दौंड गाठलं होतं आणि काही बैठकांना हजेरी लावली होती.
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मात्र यात सगळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांची जास्त (Ajit Pawar) चर्चा रंगली. शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार कुठे गेले? ते नाराज आहेत का? या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अजित पवारांनी मुंबईतून थेट दौंड गाठलं होतं आणि काही बैठकांना हजेरी लावली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (5 मे) पत्रकार परिषद घेत आपला पक्षाच्या अध्यक्ष पदाचा निर्णय जाहीर केल्यानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चाआहेत. शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केल्यानंतर अजित पवारांनी ट्वीट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली. "शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे," असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर आज सकाळी अजित पवार हे दौंड तालुक्यातील दौंड साखर कारखान्यावर आले होते. दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान अजित पवार हे दौंड साखर कारखान्याच्या मुख्य गेट बाहेर न पडता ते मागील गेटने बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.
दौंड गाठलं आणि बैठकांना हजेरी लावली
दौंड बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा अजित पवार यांनी या ठिकाणी सन्मान केला. त्यानंतर अजित पवार हे मुख्य गेटने बाहेर न पडता ते कारखान्याच्या पाठीमागील गेटने बाहेर पडले. त्यामुळे शरद पवार यांनी निर्णय मागे घेतल्यावर अजित पवार यांनी कामाला प्राधान्य देत थेट बैठकांना हजेरी लावल्याचं बघायला मिळालं.
'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते हळहळले. शरद पवारच अध्यक्ष राहतील त्यांनी निर्णय मागे घ्यावा, असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. तीन दिवस कार्यकर्त्यांनी उपोषण केलं. कार्यक्रमात एकीकडे जयंत पाटील ढसा ढसा रडत होते. तर दुसरीकडे अजित पवार हे कार्यकर्त्यांना समजावत होते. त्यांना शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मान्य असल्याचं दिसत होतं. मात्र आता शरद पवार यांनी निर्णय मागे घेतल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
पत्रकार परिषदेत दादा का नव्हते?
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागे घेतल्याचं जाहीर केलं. पण यावेळी अजित पवार त्यांच्यासोबत दिसले नाही. सिल्वर ओकमध्ये जी राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यात बैठकीत ठराविक लोकच पत्रकार परिषदेला जातील असं ठरलं होतं. त्यामुळे अजित पवार पत्रकार परिषदेत दिसले नाहीत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिलं आहे.