Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोकणातील रिफायनरी विरोधकांचे पत्र; "'कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदारी तुमची''
Maharashtra : जवळपास चार पानांचं हे पत्र असून, त्यामध्ये रिफायनरीला आमचा विरोध कायम असून रिफायनरी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Maharashtra News : कोकणातील रिफायनरी (Konkan Refinery) विरोधकांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे. कोकणातला रिफायनरी प्रकल्प आणि त्याला असलेला विरोध याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. कारण या पत्रामध्ये त्यांनी रिफायनरिला आपला असलेला विरोध, आतापर्यंतच्या अधिकारी, प्रशासनाच्या गाठीभेटी, करण्यात आलेली आंदोलनं, याबाबत पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि भविष्यात विरोधकांची भूमिका काय असेल याचा उल्लेख केला आहे. जवळपास चार पानांचं हे पत्र असून त्यामध्ये रिफायनरीला विरोध आमचा कायम असून रिफायनरी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. रिफायनरी संदर्भातील कोणतेही काम नागरिकांनी शांततेच्या मार्गाने रोखल्यास आणि त्यानंतर त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपली असेल या पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे.
'कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदारी तुमची'; रिफायनरी विरोधकांच्या पत्रात उल्लेख
यापूर्वी नाणार येथील रिफायनर प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव तसेच आसपासच्या गावातील जमिनीचा विचार रिफायनरी प्रकल्पासाठी केला जात आहे. पण या ठिकाणी स्थानिकांचा मोठा विरोध आहे. तर समर्थकांची दिसणारी संख्या तुलनेने कमी असून प्रकल्पाचे समर्थन करणारे स्थानिक नसल्याचा इथल्या गावकऱ्यांचे म्हणणं आहे. दरम्यान सध्याच्या घडीला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षण आणि ड्रोन सर्वेक्षण केले जात आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. पण गावकऱ्यांनी या माती परीक्षणाला आणि ड्रोन सर्वेक्षणालाच विरोध केला आहे. त्यावरून यापूर्वी मोठी आंदोलन देखील झालेली आहेत. शिवाय गावकऱ्यांनी राजापूर तहसील कार्यालयावर ती मोर्चा देखील काढलेला आहे. त्यानंतर देखील रिफायनरी प्रकल्प आणल्यास आमचा त्याला विरोध असेल असं इथल्या नागरिकांचे म्हणणं आहे.
पोलीस दडपशाही करत असल्याचा देखील पत्रात उल्लेख
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत रिफायनरी प्रकल्पासाठी जागा देण्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यावरून देखील शिवसेने विरोधात मोठा रोष या ठिकाणी दिसून आला होता. पण शिवसेनेने आम्ही स्थानिकांची बाजू ऐकून घेऊ असं म्हटलं होतं. त्याच वेळेला शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी मात्र उघडपणे प्रकल्पाच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली होती. शिवाय भेटीचा प्रयत्न करून देखील रिफायनरी विरोधक आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे देखील एक नाराजी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत दिसून येते. यानंतर स्थानिकांनी सर्वच गावांमध्ये राजकीय आखाड्यात उतरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसून त्यांच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर रिफायनर ची समर्थन करणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काय भूमिका घेतात? हे पाहावं लागेल.