Maharashtra Political Crisis : शिवसेना-बंडखोरांमधील 'अंतर वाढलं' एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांचे गुवाहाटीला एअरलिफ्ट
Eknath shinde : सुरतच्या हॉटेलमधून हे आमदार आता गुजरात पासिंगच्या गाड्यांमधून विमानतळाकडे जात असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
मुंबई: राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापत असल्याचं चित्र असून वेगवान घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबच्या सर्व बंडखोर आमदारांचे आता सुरतवरुन एअरलिफ्ट करण्यात येत असून त्यांना आता गुवाहाटीला नेण्यात येत असल्याची माहिती आहे. सुरतच्या हॉटेलमधून हे आमदार आता गुजरात पासिंगच्या गाड्यांमधून विमानतळाकडे जात आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 आमदार असून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारला आहे. हे आमदार पहाटे सुरतमध्ये आले होते. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सुरतला गेले. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
शिवसेनेने महाविकास आघाडीसोबतच्या सरकारमधून बाहेर पडावं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चाही झाल्याची माहिती आहे.
आता या सर्व आमदारांना गुवाहाटीला नेण्यात येत असून रात्री एक वाजेपर्यंत ते गुवाहाटीला पोहोचणार आहेत.
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे फोनवरुन चर्चा
मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक यांची एकनाथ शिंदे यांची भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये राहू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुमचं काही नाही,माझं काही नाही तर जायचं कशाला?
उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पुन्हा एकदा शिवसेना आमदारांची आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार - खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदेशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला असला तरी त्यावर तुर्तस कोणतीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह स्थापन केलेली महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केले आहे.