Chandrakant Khaire Vs Vanchit : खैरेंच्या 'त्या' विधानानंतर 'वंचित'ने बोलावली तातडीची बैठक; आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून एक हजार कोटी घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
Chandrakant Khaire Vs Vanchit: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांच्या याच विधानावरून आता नवीन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण खैरेंच्या विधानाला उत्तर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादमध्ये तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.
खैरे यांनी केलेल्या आरोपानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या शहर आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची दुपारी 3 वाजता तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. सुभेदारी शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडणार आहे. वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन कामगार आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर खैरेंनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थ पक्षाची पुढील दिशा या बैठकीत ठरवली जाणार आहे.
काय म्हणाले होते खैरे...
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला आहे.
जलील यांचे उत्तर...
प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबरच एमआयएमवर सुद्धा एक हजार कोटी घेतल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. त्यामुळे या आरोपावर बोलताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव खैरे अजूनही पचवू शकले नाही असे त्यांच्या विधानावरून जाणवत आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आरोप एन्जॉय करतोय, असा टोला जलील यांनी खैरेंना लगावला आहे.