(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded News : स्वतःचे लग्नविधी टाळून आमदार थेट मुंबईत दाखल! राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गाठलं पक्ष कार्यालय
Nanded News : लग्नघटिका समीप येत असतानाच विधीमंडळ सचिवालयातून गुरूवारी होणार्या बहुमत चाचणीसाठी आपण निमंत्रित असून उपस्थित राहावे, अशा आशयाचे पत्र प्राप्त झाले.
Nanded News : सध्या राज्याच्या राजकारणात कालपर्यंत अनेक खलबतं व बर्याच गोष्टी घडत होत्या. अशा वेळेत नांदेडच्या आमदाराने चक्क स्वतः च्या लग्नविधी टाळून थेट मुबंई येथील पक्ष कार्यालय गाठलंय. काय घडलं नेमकं?
बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहण्याचं मिळालं पत्र
नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार जितेश अंतापुरकर यांचा विवाह 3 जुलैला प्रतिक्षा वाघमारे यांच्याशी होणार आहे. हिंदू रितीरिवाजा प्रमाणे लग्नापूर्वीच्या विधींना पाच दिवस लागतात, दरम्यान, काल बुधवार पासूनच आमदार जितेश यांच्या विवाह विधीस सुरवात झालीय. मात्र आमदार अंतापुकर हे मुंबईवरुन नांदेडला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित होते. त्याच वेळी त्यांना विधीमंडळ सचिवालयातून गुरूवारी होणार्या बहुमत चाचणीसाठी आपण निमंत्रित असून उपस्थित राहावे, अशा आशयाचे पत्र प्राप्त झाले. ज्यामुळे लग्नघटिका समीप येत असताना सुद्धा जितेशरावांना आधी "लगीन कोंढण्याचं म्हणत" कर्तव्यावर जावं लागलंय. ज्यात लागलीच पक्षाकडून बोलावणं झालंय. मग काय आमदार महोदयास लग्नकार्यातील विधीस फाटा देत हैद्राबाद मार्गे मुंबईकडे रवाना व्हावं लागलंय.
गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई
आमदार जितेश अंतापुरकराचा साक्षगंध सोहळा हा आठ जूनला पार पडलाय. त्याचवेळी त्याच्या लग्नाची तारीख तीन जुलै ठरली होती. त्यानुसार लग्नाची तयारी सुरु झाली, वधू वर मतदारसंघातीलच रहिवासी असल्याने अंतापुकर कुटुंबासह कार्यकर्त्याची गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू केलीय. मतदार संघातील युवा नेतृत्वाचा विवाह असल्याने युवकातही उत्साहाचे वातावरण आहे. आणि याच कालावधीत राजकीय घडामोडींना वेग आल्याने वरासाठी खरी लगीनघाई आहे.
लग्नातील काही विधींना फाटा देत कर्तव्यपूर्तीसाठी मुंबईला - आमदार
यासंदर्भात जितेश अंतापुरकरांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, "लग्न हा प्रत्येक कुटुंबात आनंदाचा क्षण असतो, तसा तो आमच्या कुटुंबासाठीही आहे. पण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमच्या सरकारवर आलेले संकट टळणे महत्वाचे आहे. त्यामुळे लग्नातील काही विधींना फाटा देत कर्तव्यपूर्तीसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी म्हटलंय. मात्र रात्री मुख्यमंत्री यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आता आमदार जितेश अंतापुरकरांचा लग्नासाठी घरी येण्याचा मार्ग मोकळा झालाय.