Mask : क्लीन अप मार्शलच्या 'मास्क वसुली'पासून नागरिकांना मुक्ती; राज्यात मास्कचा वापर आता ऐच्छिक
Maharashtra Corona Updates : मास्क न वापरल्यास जो दंड आकारला जायचा आता तो आकारण्यात येणार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.
मुंबई: राज्यातील कोरोनाचे निर्बंध आता हटवण्यात आलं असून मास्कचा वापर हा ऐच्छिक करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्यांना मास्क वापरायचा आहे त्यांनी वापरावा, तुमच्या सुरक्षेसाठी मास्कचा वापर करा असंही आवाहन त्यांनी केलं आहे. मास्कचा वापर ऐच्छिक केल्यानंतर नागरिकांची क्लीन अप मार्शलच्या वसुलीपासून सुटका झाली आहे.
राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर आता आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात आला आहे. याआधी मास्कचा वापर न केल्यास त्यावर दंड आकारला जात होता तो आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे क्लीन अप मार्शल आणि पोलिसांच्या दंड वसुलीपासून सामान्यांची सुटका झाली आहे.
या आधी मास्कचा वापर नसेल तर क्लीन अप मार्शलकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. तर मुंबई सोडून इतर ठिकाणी पोलीस ही दंडात्मक कारवाई करायचे. राज्य सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे नागरिकांना आता या वसुलीपासून मुक्ती मिळाली आहे.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता महाराष्ट्रात कोणतेही निर्बंध नसतील. गुढीपाडव्याच्या शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद यासारखे सण-उत्सव उत्साहात साजरे करता येणार आहेत.
महाराष्ट्रात उद्यापासून काय काय बदलणार?
- 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात कोरनाचे सर्व निर्बंध हटतील
- मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील
- रेल्वे, बस प्रवासासाठी कोरोना लसीच्या प्रमाणपत्राची गरज नाही
- गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार
- केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल
- मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल
- हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही
- लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही
राजेश टोपे काय म्हणाले?
- गुढीपाडवा निमित्ताने आपण निर्बंधमुक्तीची घोषणा करत आहोत. निर्बंधमुक्ती होत असली तरी आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मास्कची सक्ती नसेल,
- मास्क वापरायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे, मास्क ऐच्छिक असेल.
- लोकांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क घालावं पण ते ऐच्छिक असेल. शोभा यात्रा उत्साहात साजरा करता येईल. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदेखील उत्साहात साजरी करता येईल
- महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि टास्क फोर्सचे नियम बघूनच निर्णय घेतला आहे.